भारताचा माजी गोलंदाज प्रविण कुमारने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारत असल्याचं जाहीर केलं आहे. 2005-06 साली रणजी क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून पदार्पण करणाऱ्या उमेश यादवने, पहिल्या दोन हंगामांमध्ये तब्बल 90 बळी घेत निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधलं. 2007 साली जयपूर येथे पाकिस्तानविरुद्ध वन-डे सामन्यात प्रविण कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

चेंडू स्विंग करण्यामध्ये माहिर असलेल्या प्रविण कुमारने अल्पावधीतच टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज म्हणून नाव कमावलं. मात्र वन-डे क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमधले त्याला फारशी संधी मिळाली नाही. प्रविण कुमारने 6 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं ज्यात त्याने 27 बळी घेतले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन-डे मालिकेत त्याने केलेली गोलंदाजी आजही क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे.

“मी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारण्याचं ठरवलं आहे. हा निर्णय मी घाईत घेत नाहीये, यावर मी खूप विचार केला आणि निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मला जाणवलं. मला संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना व राजीव शुक्ला यांचा कायम आभारी असेन.” इंडियन एक्स्प्रेसशी बोलत असताना प्रविण कुमारने आपल्या भावना मांडल्या.