भारतीय पॅरालिम्पिक असोसिएशनची बंदी उठवली
भारतीय पॅरालिम्पिकपटूंना आगामी रिओ पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी दिलासा मिळाला आहे. भारतीय पॅरालिम्पिक असोसिएशनवरील (पीसीआय) बंदी तात्पुरती मागे घेतल्यामुळे या खेळाडूंना देशाच्या तिरंगी ध्वजाखाली खेळता येणार आहे.
आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने (आयपीसी) नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा ७ ते १८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा होईपर्यंतच बंदीची कारवाई मागे घेण्यात आली आहे.
देवेंद्र झाझरिया, सुंदरसिंग गुज्जर, संदीप सिंग, नरेंदर रणबीर, ऋषिकांत शर्मा, वीरेंदर, अमितकुमार सरोहा, शरदकुमार, वरुणसिंग भाटी, मरिय्यापन, अरविंदकुमार, सुयश जाधव, रामपाल चहार, आनंदन गुणशेखरन, अंकुर दामा, नरेशकुमार शर्मा, फरमान भाशा, संदीपसिंग मान हे पुरुष गटात आणि महिलांमध्ये दीपा मलिक, कर्माज्योती यांनी पॅरालिम्पिकमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे.