अपंग व विकलांग खेळाडूंच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंची झालेली गैरव्यवस्था तसेच अनागोंदी कारभार यामुळे भारतीय पॅराऑलिम्पिक महासंघावर (पीसीआय) आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक महासंघाने (आयपीसी) अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.
गाझियाबाद येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी सहभागी खेळाडूंचे अतिशय हाल झाले होते. निवास, भोजन, शौचालय आदीबाबत खेळाडूंना खूपच समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे अनेक खेळाडूंनी आयपीसी व केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आयपीसीने पीसीआयवर तातडीने बंदी घातली. आयपीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेवियर गोन्झालेस यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की पीसीआयमधील असलेल्या गटबाजीमुळे खेळाडूंचे अतोनात हाल होत आहेत. खेळाडूंच्या विकासासाठी काहीही ठोस प्रयत्न केल्याचे दिसून येत नाहीत. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.  पीसीआयचे सरचिटणीस जे. चंद्रशेखर यांनी सांगितले,  ‘‘या कारवाईमुळे खेळाडूंचे खूप नुकसान होणार आहे.  आम्ही ही कारवाई मागे घ्यावी अशी विनंती आयपीसीला करणार आहोत.’’

*भारत खुली पॅराक्रीडा स्पर्धा येथे २ ते ९ मे या कालावधीत होणार आहे. बंदीचा या स्पर्धेवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.  
*केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही पीसीआयला कारणे दाखवा नोटीस पाठविली असून, त्यांची शासकीय मान्यता काढून घेण्याचा इशारा दिला.