भारतीय महिलांचा ४ बाय ४०० मीटर रिले संघ आशियाई स्तरावर सर्वोत्तम संघ मानला जात असला तरी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील प्राथमिक फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष गटातील चालण्याच्या स्पर्धेतही भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशाच आली. याचप्रमाणे भारताचे आशास्थान असलेल्या विकास गौडाला थाळीफेकीत नवव्या क्रमांकापर्यंतच झेप घेता आली.

पुरुषांच्या ५० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार व मनीषसिंग रावत हे भारताचे दोन खेळाडू सहभागी झाले होते. संदीपने तीन तास, ५८ मिनिटे, ३ सेकंदांत ही शर्यत पार करीत २६वे स्थान मिळवले. संदीपची या मोसमातील ही सर्वोत्तम वेळ आहे. रावतने त्यानंतर आठ दशांश सेकंदांनी शर्यत पूर्ण करीत २७वे स्थान पटकावले.
महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारतीय संघाचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपले. टिंटू लुका, एम. आर. पुवम्मा, देबश्री मुजुमदार व जिस्ना मॅथ्यू यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने हे अंतर तीन मिनिटे, २९.०८ सेकंदांत पार केले.
आशियाई व राष्ट्रकुल विजेत्या विकासने ६२.२४ मीटपर्यंतच थाळी फेकली. त्याने पात्रता फेरीत ६३.८४ मीटरची कामगिरी केली होती. त्याने या मोसमात ६५.७५ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. त्या कामगिरीच्या जवळही त्याला पोहोचता आले नाही. अमेरिकेत सराव करणाऱ्या विकासकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. मात्र दडपणाखाली त्याची कामगिरी खराब झाली. पोलंडच्या पिओत्र मालाचोवस्कीने ६७.४० मीटरची कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. विकास याची ही पाचवी जागतिक स्पर्धा आहे. २००५ व २००७ मध्ये त्याला पात्रता फेरीतच पराभूत व्हावे लागले होते. २०११ व २०१३ मध्ये त्याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.