रिओ येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेत मागील ऑलिम्पिक स्पध्रेपेक्षा पदकांची संख्या वाढवण्याचा निर्धार या सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी व्यक्त केला आहे. सोमवारी ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’तर्फे मुंबईत आयोजित केलेल्या ‘काऊंटडाऊन टू रिओ’ या शानदार कार्यक्रमात दिग्गज खेळाडूंनी आणि माजी जगज्जेत्या खेळाडूंनी आपल्या भावना प्रकट केल्या.

‘‘गेल्या काही वर्षांत ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना सरकारकडून उत्तम मदत मिळत आहे. ओजीक्यूसारख्या अनेक खासगी संस्थांचीसुद्धा मदत मिळत आहे. मागच्या ऑलिम्पिकपेक्षा यंदा पदकांची संख्या वाढेल,’’ अशी अपेक्षा माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोणने प्रकट केल्या. ‘‘ऑलिम्पिकसाठी फक्त दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. सर्वच खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदकतालिकेत भारतीय खेळाडूंची पदके वाढतील,’’ अशी आशा पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केली. तर माजी बिलियर्ड्सपटू गीत सेठी म्हणाला, ‘‘एके काळी फक्त सहभागासाठी ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू जायचे, पण आता पदकविजेत्यांमध्येसुद्धा आपल्या देशाचे खेळाडू असतात, ही चांगली गोष्ट आहे.’’

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू म्हणाली की, ‘‘मी जेव्हा १४ वर्षांचे तेव्हापासून आतापर्यंत मला ‘ओजीक्यू’ माझ्या पाठीशी आहे. कारकीर्दीतील पहिले ऑलिम्पिक असल्यामुळे मी अतिशय उत्सुक आहे.’’

‘‘मी दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. भारतासाठी पदक मिळवण्याचा माझा निर्धार पक्का आहे. मेहनतीने तयारी सुरू आहे. यंदा भारताच्या पदकांची संख्या आणखी वाढेल,’’ असे मत बॉक्सिंगपटू शिवा थापाने व्यक्त केले.

माझे ऑलिम्पिकमधील हे दुसरे ऑलिम्पिक असले, तरी पहिले असल्याप्रमाणेच माझी उत्कंठा टिकून आहे. माझी तयारी आणि शिकण्याची प्रक्रिया ही निरंतर चालू आहे. सुमारे एक अब्जावधी भारतीयांच्या आशा आमच्यावर अवलंबून आहेत,

– हिना सिधू , नेमबाज