आशियाई क्रीडा स्पर्धा अर्ध्यावर आली तरी या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना अद्याप दैनंदिन भत्ता देण्यात आलेला नाही, अशी माहिती भारतीय पथकातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.

खेळाडूंना स्पर्धेच्या काळात दररोज ५० अमेरिकन डॉलर्सचा भत्ता देण्यास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंजुरी दिली होती. क्रीडानगरीमध्ये खेळाडूंना सुविधांची कमतरता नसली तरी खेळाडूंना मंजूर करण्यात आलेला भत्ता वेळेवर मिळणे आवश्यक आहे. पथकातील वरिष्ठ खेळाडूंना आर्थिक अडचणी निर्माण होत नाहीत, मात्र कनिष्ठ खेळाडूंना याबाबत थोडीशी समस्या निर्माण झाली आहे.

भत्ता देण्यास मंत्रालयाने मंजुरी दिली असली तरी त्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे सोपवण्यात आली आहे. टेनिसपटूंचे सामने शुक्रवारी संपले असून नौकानयनमधील खेळाडू मायदेशी रवाना होण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही नेमबाजही जागतिक स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. भारतीय पथकातील सर्व खेळाडूंना विदेशी मुद्रा कार्ड देण्यात आले असले तरी त्यावर अद्याप रक्कम जमा करण्यात आलेली नाही. लवकरच हे कार्ड सुरू होईल. याबाबत आम्ही मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत, असे भारतीय पथकाचे उपपथक प्रमुख बी. एस. कुशावाह यांनी सांगितले.

सायली शेळकेच्या प्रकृतीत सुधारणा

पालेमबंग : भारतीय महिला नौकानयनपटू सायली शेळकेच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून पुढील एक आठवडा ती पालेमबंग येथेच उपचारासाठी राहणार आहे. पोटात दुखू लागल्याने शनिवारी सायलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.