करोनाचे संकट टळल्यावर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सुरळीतपणे होईल की नाही, हे कोणीही सांगू शकत नाही; परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका वाचवण्यासाठी भारतीय खेळाडू विलगीकरणासाठीही नाइलाजास्तव तयार आहेत, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांदरम्यान ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार असून त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

‘‘क्रीडा स्पर्धाना कधी सुरुवात होईल, हे मलाही ठाऊक नाही; परंतु भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासंबंधीची सर्व तयारी अद्याप सुरू आहे. त्या तुलनेत ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाविषयी मला साशंकता वाटते,’’ असे धुमाळ म्हणाले.

‘‘विश्वचषक जर आखलेल्या नियोजनाप्रमाणे होणार असेल तर त्यापूर्वी खेळाडूंची चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच विश्वचषक रद्द करण्यात आला, तर भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वीसुद्धा आम्ही खेळाडूंची चाचणी करण्याचा प्रस्ताव ‘आयसीसी’पुढे नक्की ठेवू. किंबहुना भारताचे खेळाडू या मालिकेसाठी विलगीकरणही करतील,’’ असेही धुमाळ यांनी सांगितले. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ३० कोटी डॉलरचे नुकसान होऊ शकते.