‘स्पॉट-फिक्सिंग’च्या गर्तेत सापडल्यापासून आयपीएलच्या अनेक काळ्या बाजू प्रकाशमान होऊ लागल्या आहेत. याचप्रमाणे मोठय़ा आर्थिक व्यवहारांना वाव देणारी ही स्पर्धा बंद करावी, अशी मागणीसुद्धा जोर धरू लागली आहे. सहा वर्षांच्या या स्पध्रेतील वाद आता चव्हाटय़ावर आल्यामुळे ही स्पर्धा किती वाईट आहे, हेच प्रकर्षांने सिद्ध होत आहे. या निमित्ताने आयपीएल स्पध्रेची ‘इंडियन पाप लीग’, ‘इंडियन पैसा लीग’, ‘इंडियन फिक्सिंग लीग’ अशी संभावनासुद्धा होत आहे. पण २००८पासून सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी स्पध्रेने अनेक खेळाडूंच्या स्वप्नांचीही पूर्ती केली आहे. या स्पध्रेत खेळल्यामुळे मिळणाऱ्या पैशातून त्यांचे जीवनमान बदलले आहे. टुमदार घर, गाडी आणि आर्थिक सुबत्ता या महत्त्वाच्या गोष्टी उदयोन्मुख खेळाडूंना आयपीएलमुळेच मिळाल्या.
अब्जावधी लोकसंख्येचा भारत. या देशात क्रिकेट म्हणजे जणू प्राणवायूच. स्वाभाविकपणे येथील प्रत्येक जण सचिन तेंडुलकर व्हायचे स्वप्न जोपासून क्रिकेट खेळत असतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) वर्षभरासाठी ३६ क्रिकेटपटूंना वार्षिक रक्कम देऊन करारबद्ध करते. यातून खेळाडूंना ‘अ’ श्रेणीसाठी एक कोटी, ‘ब’ श्रेणीसाठी ५० लाख आणि ‘क’ श्रेणीसाठी २५ लाख रुपये मिळतात. याचाच अर्थ वर्षांला किमान ४० खेळाडूंना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. मग बाकीच्यांचे काय? रणजी क्रिकेटपर्यंत पोहोचू शकल्यास एका सामन्यापोटी १० हजार रुपये मानधन मिळते आणि रणजी विजेते किंवा उपविजेते झाल्यास त्या रकमेतील हिस्सा यावरच खेळाडूंचा उदरनिर्वाह चालतो. आयपीएलमधील प्रत्येक संघाकडे करारबद्ध केलेले ३६ खेळाडू आहेत. त्यामुळे या खेळाडूंचे आर्थिक प्रश्नही सुटले आहेत. संघर्षमय दिवसांतून वाटचाल करून आयपीएलमधून प्रामाणिकपणे मिळणाऱ्या पैशामुळे आता शानदार जीवनशैली प्राप्त झालेल्या अशाच काही खेळाडूंचा घेतलेला हा वेध-
 रवींद्र जडेजा : २००५मध्ये रवींद्रची आई लताचे अपघाती निधन झाले. दु:खाचा पहाड जडेजा कुटुंबीयांवर कोसळला. या धक्क्यातून सावरणे रवींद्रला कठीण जात होते. क्रिकेट सोडण्याच्या विचाराने त्याच्या मनात थमान घातले होते. त्याचे वडील अनिरुद्धसिंह खासगी सुरक्षा संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला होते, तर बहीण नैना जामनगरच्या एका रुगणालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. पण रवींद्रचे प्रशिक्षक महेंद्रसिंग चौहान यांनी त्याला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर आणले आणि हेच तुझे जीवन आहे, हे पटवून दिले. २००८मध्ये भारतीय युवा संघाने विश्वचषक (१९-वर्षांखालील) जिंकण्याची किमया साधली. तेव्हा प्रथमच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं..’ हे या कुटुंबीयांनी अनुभवले. त्यावेळी जडेजा भारतीय युवा संघाचा उपकर्णधार होता. बीसीसीआयकडून १५ लाखांचे इनाम, २५ हजार रुपये पगाराचा रिलायन्सचा तीन वर्षांचा करार त्याला मिळाला. त्याचवेळी आयपीएलचा पहिला मोसम बहरला. पहिल्या दोन हंगामांसाठी रवींद्रला प्रत्येक वर्षांकाठी २० लाख रुपयांचा करार मिळाला. स्वाभाविकपणे जडेजा कुटुंबीयांना चांगले दिवस आले. त्यानंतर रवींद्रला भारतीय संघाचे द्वारही सताड खुले झाले. ‘महेंद्रसिंग धोनीचा लाडका’ असे रवींद्रविषयी नेहमीच म्हटले जाते. आयपीएलच्या पाचव्या पर्वाच्या लिलावात हे प्रेम सर्वप्रथम दिसून आले. चेन्नई सुपर किंग्जने ९.७२ कोटी रकमेला रवींद्रला खरेदी केले. दोन वर्षांपूर्वीच आपल्या शानदार ऑडीतून आता रवींद्र फिरतो. यंदाच्या आयपीएल हंगामात धोनीने त्याला ‘सर’ हे नवे टोपणनाव दिले. पण या सरांच्या मध्यमवर्गीय जीवनशैलीला पालटले ते आयपीएलनेच.
इक्बाल अब्दुल्ला : मुंबईच्या प्रारंभीच्या दिवसांत कुल्र्याहून आझाद मैदान गाठताना इक्बाल अब्दुल्लाची लोकल पकडण्यासाठी खूप कसरत व्हायची. खांद्यावरची जड किटबॅग कशीबशी सावरत मैदान गाठण्याची ही वणवण इक्बालप्रमाणेच लाखो मुंबईकर मुले करतात. ‘मुंबईच्या रेल्वे प्रवासानेच मला खंबीर बनवले,’ असे तो आवर्जून सांगतो. पण आता तीन वष्रे झाली, इक्बालने लोकल पकडलेली नाही. २३ वर्षीय इक्बालचा कलिनाच्या एका सुखवस्तू इमारतीत फ्लॅट आहे आणि आवारात एक छान गाडीसुद्धा आहे. इक्बालचे शिक्षण मदरशामध्ये झाले. आझमगढमध्ये त्याच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. आठ वर्षांपूर्वी इक्बालने क्रिकेटसाठी कुल्र्यामध्ये स्थलांतर केले. तेव्हा इक्बाल साध्या घरात राहायचा. मग मुंबईकडून तो रणजी खेळू लागला. २०११मध्ये ‘कोलकाता नाइट रायडर्स’ने इक्बालला एक कोटी रुपयांना खरेदी केले. त्यानंतर इक्बालचे आयुष्यच बदलले. एक दिवस असा होता की, सायंकाळी सराव करून आल्यावर सर्वप्रथम आपले कपडे उद्या खेळण्यासाठी धुवावे लागायचे. पण आज तो ब्रँडेड कपडे परिधान करतो. ‘‘‘सचिन तेंडुलकरसोबत आपण खेळू किंवा शाहरूख खान नावानिशी मला ओळखेल, असे मला कधीच वाटले नव्हते. पैसे कमवण्याला मी कधीच प्राधान्य दिले नाही. चांगले क्रिकेट खेळायचे आणि एके दिवशी देशाचे प्रतिनिधित्व करायचे, हेच माझे ध्येय आहे,’’ असे इक्बाल प्रामाणिकपणे सांगतो.
सौरभ तिवारी : सौरभ मूळचा झारखंडचा. म्हणजेच भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनीच्याच राज्यातला. प्रथमदर्शनी तर सौरभ धोनीचीच प्रतिकृती असल्याप्रमाणे भासतो. २००५पासून तो झारखंड संघाकडून रणजी क्रिकेट खेळतो आहे. पण आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याच्या फलंदाजीने सर्वप्रथम सर्वाचे लक्ष वेधले. त्यानंतर २०१०मध्ये त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. छोटय़ा शहरातील या गुणवान खेळाडूला आयपीएलनेच व्यापक व्यासपीठ मिळवून दिले. आयपीएलच्या चौथ्या हंगामात ‘रॉयल चॅलेंजर्स’ बंगळुरूने त्याला ७.३६ कोटी रुपये रकमेला खरेदी केले. जमशेदपूरला त्याच्या गावी याचे खूप अप्रूप होते. आधी सौरभच्या केसांची आणि धोनीचा वारसदार असल्याची चर्चा व्हायची, पण नंतर त्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. मग त्याने होंडा सिटी खरेदी केली आणि जमशेदपूरलाच तो नवे घरही बांधतो आहे.
मनोज तिवारी : १२ वर्षांपूर्वी मनोज जेव्हा सहाव्या इयत्तेत नापास झाला, तेव्हा त्याच्या वडिलांनी एक खासगी शिक्षक त्याला शिकवण्यासाठी नियुक्त केला. तेव्हा त्याचे वडील श्याम शंकर यांचा पगार बेताचाच होता. त्यामुळे घर चालवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करायला लागायची. परंतु मुलाला योग्य शिक्षण द्यायला हवे, अशी त्यांची धारणा होती. हावडा येथील तेलकोलघाट परिसरात त्यांचे वडिलोपार्जित घर होते. वडील आतासुद्धा भारतीय रेल्वेमध्ये फिटर म्हणून काम करतात. पण आता तिवारी कुटुंबीय अलिशान डय़ुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहतात. २००६-०७च्या रणजी हंगामात मनोजने आपल्या दमदार कामगिरीने लक्ष वेधले. मग २००७मध्ये बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात वर्णी लागली. पण दुखापतीमुळे त्याला २००८पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. पहिल्याच आयपीएल हंगामासाठी ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ने बंगालच्या या अष्टपैलू खेळाडूला ६.७५ लाख अमेरिकन डॉलर्स रुपयांना खरेदी केले आणि मनोजचे जीवनमान बदलले. प्रारंभीच्या दिवसांत रेल्वे आणि बस असा दगदगीचा प्रवास करून प्रशिक्षण अकादमी गाठण्यासाठी मनोजला खूप परिश्रम करायला लागायचे. पण आता मनोजच्या दिमतीला हुंदाय आय-टेन, टोयोटा फॉच्र्युनर आणि होंडा सीआरव्ही अशा तीन गाडय़ा आहेत.
उमेश यादव : नागपूरपासून २५ किमी अंतरावर वलनी गावचा उमेश यादव हा निवासी. या ठिकाणी कोळशाच्या अनेक खाणी आहेत. या खाणीमध्ये तिलक यादव काबाडकष्ट करायचे. एके दिवशी तुमचे आयुष्य बदलून जाणार आहे, असे काही वर्षांपूर्वी त्यांना कुणी सांगितले असते, तर ते हसले असते. आपला छोटा मुलगा उमेशने पोलीस व्हावे, असे त्यांना खूप वाटत होते. उमेशने त्यादृष्टीने प्रयत्नही केला होता. भारतातर्फे खेळण्याचे आणि शानदार जीवनशैलीचे स्वप्न त्याने कधीच पाहिले नव्हते. टेनिसच्या चेंडूने खेळणाऱ्या या उमेशची गुणवत्ता एका प्रशिक्षकाने हेरली आणि तेथूनच त्याचा खरा प्रवास सुरू झाला. २०१०मध्ये उमेशने भारतीय संघात स्थान मिळवले आणि आयपीएलच्या चौथ्या पर्वात ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ने त्याला मोठय़ा रकमेला खरेदी केले. आता मारुती स्विफ्ट ही दुसरी कार उमेशच्या घरासमोर दिसते आहे. त्याने शर्यतीच्या दर्जाची बाइकसुद्धा खरेदी केली आहे. याचप्रमाणे त्याचे घर आता कात टाकून टुमदार झाले आहे. गेल्याच वर्षी जामठाच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या नजीक त्याने नवे घर बांधण्यासाठी एक भूखंडसुद्धा खरेदी केला आहे. उमेश नेहमी म्हणतो की, ‘‘माझ्या आयुष्यातील काही दिवस असे होते की, खिसे रिकामे असायचे. पण आज क्रिकेटमुळे माझे आयुष्य बदलले आहे. मी देवाचा खूप ऋणी आहे.’’ मुलाने घराला चांगले दिवस दाखवल्यामुळे आता तिलक यादव यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कारण कोळशांच्या खाणीत आयुष्य वेचणाऱ्या यादव यांना आता सोनेरी दिवस आले आहेत.