टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही महिने उरले असताना भारतालाही डोपिंगचा फटका बसला आहे. भारतीय नेमबाज रवि कुमार आणि बॉक्सर सुमित सांगवान हे उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत (डोपिंग) दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ‘वाडा’कडून (वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २९ वर्षीय रविकुमारने शूटिंग विश्वचषक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते. डोपिंग चाचणीचे निकाल आल्यानंतर त्याला ‘वाडा’कडून निलंबनाचे आदेश देण्यात आले.

भारतीय बॉक्सर सुमित सांगवान याच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २६ वर्षीय सांगवान याने २०१७ एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले होते. मात्र बंदी असलेल्या एसिटाजोलमाईड या द्रव्याचे त्याने सेवन केल्याचे चाचणीत निष्पन्न झाले. त्यामुळे त्यालाही टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभाग घेता येणार नाही. भारतीय नेमबाज रवि कुमार आणि बॉक्सर सुमित सांगवान हे दोघेही आता भारताच्या ऑलिम्पिक पथकाचे सदस्य असणार नाहीत.

सोमवारी वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच ‘वाडा’ने डोपिंगच्या आरोपाखाली रशियावर ४ वर्षांसाठी बंदी घातली. त्यामुळे आता पुढील चार वर्षे रशियाचा कोणताही खेळाडू कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. रशियाच्या खेळाडूंबाबत डोपिंगची अनेक प्रकरणे उघडकीस आली होती, त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोपदेखील झाले. अखेर आज (सोमवारी) ‘वाडा’ने रशियावर चार वर्षांची ऑलिम्पिकबंदी घातली. त्यामुळे पुढची चार वर्षे रशियाचा ध्वज, राष्ट्रगीत आणि संघाचे नाव ऑलिम्पिकमध्ये कुठेही पाहायला किंवा ऐकायला मिळणार नाही.