|| तुषार वैती

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजे मनोरंजनाचा धमाका. पुढील दोन महिने दर दिवशी किमान एका चित्रपटाइतका थरार अनुभवण्याची नामी संधी. मात्र यंदा या मनोरंजनाच्या पर्वणीला गंभीरतेची किनार लाभली आहे. ती म्हणजे आयपीएलच्या समारोपानंतर १५ दिवसांनी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची. संपूर्ण वर्षभरातील अतिक्रिकेटचा ताण हलका करण्यासाठी आयपीएलकडे बघितले जायचे; पण आता खेळाडूंसमोर दुखापतीची ईडा-पीडा टाळण्याचे आणि विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज व्हायचे आव्हान असणार आहे. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून आयपीएलची चर्चा नव्हे तर खेळाडूंवरील ताण आणि दुखापती यांचीच चर्चा अधिक रंगू लागली आहे.

यापूर्वी २०११ आणि २०१५च्या विश्वचषक स्पर्धेनंतर आयपीएलचे पर्व रंगले होते, त्यामुळे सर्व खेळाडू निर्धास्त होते; पण इंग्लंडमधील क्रिकेट मोसम जूनपासून सुरुवात होत असल्यामुळे या वेळी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळल्यानंतर विश्वचषकात उतरावे लागणार आहे. कामाचा ताण अधिक वाढू नये यासाठी परदेशातील बहुतेक खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेत देशाला प्रथम प्राधान्य दिले आहे. या वेळी आयपीएलचे पर्व थोडक्यात असावे, अशी विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे केली होती; पण बीसीसीआयने आयसीसीलाच कोंडी पकडत आपल्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेल्या आयपीएलच्या वेळापत्रकाला कात्री लावली नाही.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील घवघवीत यशानंतर विराटसेनेचे हौसले बुलंद होते. विश्वविजेत्यांच्या थाटात वावरणाऱ्या भारतीय संघाचे विमान ऑस्ट्रेलियाने जमिनीवर आणले. त्यामुळे आता नव्याने विचारमंथन करण्याची गरज भारताला भासू लागली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी विश्वचषकासाठीचा भारतीय संघ जाहीर करण्याची फक्त औपचारिकता बाकी होती. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर भारतीय संघ निवडला जाणार नाही, असे कर्णधार विराट कोहलीने आधीच जाहीर केले होते; पण मायभूमीत झालेल्या मालिकेत भारताचे अनेक रथी-महारथी अपयशी ठरल्यानंतर निवड समितीने आता आयपीएलचा आधार घेतला आहे. चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीचा तिढा अद्याप संपलेला नाही. विजय शंकर, ऋषभ पंत, अंबाती रायुडू यांना अनेकदा संधी देण्यात आली. या अनेक वेळा प्रयोग करूनही कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्याचबरोबर तिसऱ्या फिरकीपटूला संधी द्यायची की चौथा वेगवान गोलंदाज संघात घ्यायचा, हा पेचही सोडवता आलेला नाही. महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून दुसऱ्या यष्टिरक्षकाचा शोधही अद्याप संपलेला नाही.

आयपीएलमध्ये खेळण्याचा धोका लक्षात घेता, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या विश्वचषकाच्या संघातील खेळाडूंना आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात खेळता येणार नाही, हे आधीच जाहीर केले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळानेही आपल्या खेळाडूंना मे महिन्यातच मायदेशी परत बोलावले आहे. त्याचबरोबर क्रमवारीतील अव्वल सहा संघांनी मे महिन्यात आयपीएलमध्ये खेळण्यास आपल्या खेळाडूंना मज्जाव केला आहे. फक्त भारत आणि न्यूझीलंडनेच याबाबत कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात परदेशातील अव्वल खेळाडूंचा अपवाद वगळता भारतीय आणि युवा खेळाडूंचाच खेळ क्रिकेटरसिकांना पाहता येणार आहे.

खरं तर कोटय़वधी रुपयांची बोली लावणारा खेळाडू हा सर्व सामन्यांत खेळावा, ही प्रत्येक आयपीएल फ्रेंचायझीची इच्छा आहे. फ्रेंचायझीही भारतीय खेळाडूंवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहेत; पण ५४ दिवस रंगणाऱ्या १२व्या पर्वात मात्र तसे चित्र दिसणार नाही. त्यामुळेच अखेरच्या टप्प्यात आयपीएलमधून माघार घेणारे खेळाडू हे देशसेवेसाठी माघार घेणार आहेत, हे संयोजकांनी फ्रेंचायझी आणि प्रक्षेपणकर्त्यांना पटवून दिले आहे.

लयीत परतण्यासाठी आयपीएलमध्ये खेळण्याची आणि दुखापतीचे ग्रहण मागे न लागण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा आहे; पण दुखापती हा खेळाचाच भाग असतो, हे खेळाडूंनी गृहीत धरले आहे. गेल्या वर्षी पहिल्याच सामन्यात जायबंदी झाल्यामुळे केदार जाधव संपूर्ण आयपीएलला मुकला होता. केदारच्या बाबतीत जे घडले ते यंदा आपल्याबाबतीत घडू नये, हीच प्रार्थना सर्व जण मनोमन करत असतील; पण एखादा मोठा खेळाडू आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषकात खेळू शकला नाही तर त्याचा संघाच्या कामगिरीवर नक्कीच फरक पडणार आहे.

आयपीएलसारख्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर सर्वच संघांतील खेळाडूंना ५० षटकांच्या क्रिकेटशी जुळवून घ्यावे लागणार आहे. आपल्या मानसिकतेत बदल करतानाच भारतातील पाटा खेळपट्टय़ांऐवजी इंग्लंडमधील वेगवान खेळपट्टय़ांशी कमी कालावधीत जुळवून घ्यावे लागणार आहे. खेळाचा ताण, संभाव्य दुखापतींचा धोका आणि पुरेशी विश्रांती या सर्वाचा सामना करतच खेळाडूंना आयपीएलच्या १२व्या पर्वाला सामोरे जावे लागणार आहे.