23 July 2019

News Flash

आयपीएलसाठी युवराजकडून मूळ किंमत निम्म्यावर

लसिथ मलिंगा लिलावासाठी उपलब्ध

किंग्ज इलेव्हन पंजाबने संघातून मुक्त केल्यानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामात खेळण्यासाठी युवराज सिंगने आपली मूळ किंमत दोन कोटी रुपयांवरून एक कोटीवर म्हणजेच निम्म्यावर आणली आहे.

मागील आयपीएल हंगामात युवराजला किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केल्यामुळे घरच्या मैदानावर खेळण्याचा आनंद लुटता आला होता. गेल्या वर्षी सनरायझर्स हैदराबादने संघात कायम न ठेवल्यामुळे तो दोन कोटी मूळ किमतीसह लिलावासाठी उपलब्ध होता. त्या वेळी किंग्ज इलेव्हन पंजाब या एकमेव संघाने युवराजवर बोली लावून दोन कोटी रुपयांना संघात स्थान दिले होते. किंग्ज इलेव्हन पंजाब संघातील त्याचे पुनरागमन मात्र अपयशी ठरले. आठ सामन्यांत त्याला जेमतेम ६५ धावा करता आल्या होत्या. खराब कामगिरीमुळे युवराजला सहा सामन्यांमधून वगळण्यात आले होते. आयपीएलच्या १२व्या पर्वाकरिता जयपूर येथे १८ डिसेंबरला लिलाव होणार आहे. या पाश्र्वभूमीवर पंजाब संघाने त्याला मुक्त केले आहे. ३६ वर्षीय युवराजने मात्र आपली मूळ किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लसिथ मलिंगा लिलावासाठी उपलब्ध

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा दोन कोटी रुपये मूळ किमतीसह लिलावासाठी उपलब्ध आहे.

फिंच, मॅक्सवेल अनुपलब्ध

ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात चमकदार कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल आगामी आयपीएल हंगामासाठी अनुपलब्ध असणार आहेत. मागील हंगामात फिंचने किंग्ज इलेव्हन पंजाबचे, तर मॅक्सवेलने दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले होते. व्यग्र क्रिकेट कार्यक्रमपत्रिका आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या या दोन क्रिकेटपटूंनी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

विश्वचषकाच्या तयारीचा फटका

आयपीएलच्या आगामी हंगामाला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीचा फटका बसणार आहे. मार्च महिन्याच्या मध्यावर आयपीएलचे १२वे पर्व सुरू होईल, तर मे महिन्याच्या मध्यावर ते संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड वगळता बाकी सर्वच देशांमधील क्रिकेट मंडळांनी आपल्या खेळाडूंवर र्निबध घातले आहेत. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने आपल्या खेळाडूंना २ मेपासून सुरू होणाऱ्या विशेष सराव शिबिरात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघात स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंना इंग्लंड क्रिकेट मंडळाने २५ एप्रिलपर्यंत मायदेशात परतण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू १० मेपासून सुरू होणाऱ्या तयारी अभियानात सहभागी होतील. श्रीलंकेच्या खेळाडूंना ६ मेपर्यंत परतावे लागणार आहे. तसेच बांगलादेश आणि आर्यलडच्या खेळाडूंनाही अनुक्रमे १५ एप्रिल आणि ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी व्हावे लागणार आहे.

 

First Published on December 7, 2018 1:54 am

Web Title: indian premier league 2019 auction