इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये रविवारी दुपारी होणाऱ्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु हे दोन दक्षिणेकडील संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवरील या संघांमधील जुगलबंदी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या बेंगळूरुने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुरुवातीचे सलग चार विजय मिळवून अन्य संघांना इशारा दिला आहे. मात्र उभय संघांत आतापर्यंत झालेल्या २६ सामन्यांपैकी १७ सामने चेन्नईने जिंकले आहेत. तसेच या हंगामातील सर्व सामने वानखेडेवर खेळण्याची बाब चेन्नईच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे सलग तीन विजय मिळवणाऱ्या चेन्नईविरुद्ध खेळताना बेंगळूरुला गाफील राहणे धोक्याचे ठरेल.

चेन्नई सुपर किंग्ज

गोलंदाजीत सुधारणा आवश्यक

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या गेल्या लढतीत २२० धावा करूनही गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे एकवेळ चेन्नई पराभूत होण्याची चिन्हे दिसत होती. दीपक चहर सातत्याने ‘पॉवरप्ले’च्या षटकात प्रभावी मारा करत आहे. मात्र शार्दूल ठाकूर, सॅम करनसह अन्य गोलंदाजांनी कामगिरी उंचावण्याची गरज आहे. ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यूप्लेसिस या जोडीकडून चेन्नईला पुन्हा एकदा दमदार सलामीची अपेक्षा आहे. मधल्या फळीत सुरेश रैना, मोईन अली आणि रवींद्र जडेजा या डावखुऱ्या त्रिकुटाने पुन्हा एकदा मोलाचे योगदान दिल्यास चेन्नईला सलग चौथा विजय मिळवता येईल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु

फलंदाजांची घातक चौकडी

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील शतकवीर देवदत्त पडिक्कल, कर्णधार कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स या एकापेक्षाएक चार फलंदाजांपासून चेन्नईला सावध राहावे लागणार आहे. धोनीविरुद्ध कोहलीच्या नेतृत्वाकडेही या लढतीदरम्यान सर्वांचे लक्ष असेल. हंगामात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी असलेला हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज वेगवान माऱ्याची धुरा भिस्त प्रभावीपणे सांभाळत आहेत. मात्र बेंगळूरुचे विजयी पंचक साकारण्यासाठी यजुर्वेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंनी योगदान देणे गरजेचे आहे.

 वेळ  : दुपारी ३.३० वा. ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, स्टार स्पोटर्स २, स्टार स्पोटर्स फस्र्ट, स्टार स्पोटर्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)