करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रीडा विश्वाला मोठा फटका बसला आहे. बीसीसीआय सह अन्य महत्वाच्या क्रीडा संघटनांनी महत्वाच्या स्पर्धा अनिश्चीत काळासाठी लांबणीवर टाकल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशात सध्याची परिस्थिती पाहता, यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द होण्याचे संकेत दिसत आहेत. संघमालकांनीही आर्थिक नुकसान सोसण्याची तयारी दाखवली असून, बीसीसीआयचे अधिकारीही यंदाच्या आयपीएल संदर्भात सकारात्मक दिसत नाहीयेत. मंगळवारी आयपीएलचे सर्व संघमालक टेलिकॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा करणार होते, मात्र सध्याच्या घडीला ही बैठकही रद्द करण्यात आल्याचं समजतंय. “सध्याची परिस्थिती पाहता, यंदाच्या हंगामात आयपीएल होणार नाही असं मला वाटत आहे”, आयपीएलच्या एका संघमालकाने इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला ही माहिती दिली.

आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला अंदाजे २ हजार कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. याचसोबत प्रत्येक संघमालकाहा वैय्यक्तिक स्वरुपात किमान १०० कोटींचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान आयपीएलच्या नियमांनुसार, कोणत्याही संघमालकाला नुकसानभरपाई मिळणार नसल्याचंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना स्पष्ट केलं. आयपीएल रद्द झाल्यास सध्याच्या घडीला स्पर्धा दुसऱ्या देशात खेळवण्याचा पर्यायही उपलब्ध नसल्याचं एका संघाच्या CEO ने स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – CoronaVirus : खेळाडूसह सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्याचं संरक्षण, बंगाल क्रिकेट असोसिएशनचा निर्णय

सध्या आम्ही आयपीएलबाबत विचारच करत नाहीयोत. भविष्यात पुढे काय होणार आहे याची कोणालाही माहिती नाही. परदेशी खेळाडूंसाठीचे व्हिसा नियम कधी बदलतील हे देखील स्पष्ट नाही. जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत आयपीएलबद्दल विचार करण्यात कोणताही अर्थ नसल्याचं अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. “समजा १५ एप्रिलपर्यंत भारताने परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि इतर देशांमध्ये परिस्थिती सुधारली नाही तर काय होणार हा देखील एक प्रश्नच आहे. जपाननेही यंदाचं ऑलिम्पिक पुढच्या वर्षापर्यंत स्थगित केलं आहे. सध्याची परिस्थिती ही कोणत्याही क्रीडा स्पर्धा किंवा आयपीएलपेक्षा मोठी आहे.”

मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचं आयोजन करण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली होती. मात्र आयसीसीचं कॅलेंडर पाहता हा पर्यायही उपलब्ध नसल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. मे महिन्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. याचसोबत यंदा आशिया चषकाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं.