आयपीएलच्या आतापर्यंत झालेल्या सहा पर्वामध्ये काही विशिष्ट खेळाडूंमुळे संघाला चेहरे प्राप्त झाले होते, हेच खेळाडू संघात नसतील तर बिनचेहऱ्याचे नवे संघ लिलावानंतर निर्माण होतील. या संघमालकांच्या भीतीवर मात करण्यासाठी आयपीएल प्रशासकीय समितीने एक जालीम ‘पंचकर्म’ चिकित्सा पद्धती राबवली आहे. यानुसार २०१४मध्ये होणाऱ्या आयपीएल लिलावाआधीच प्रत्येक फ्रेंचायझींना आपल्या संघातील पाच खेळाडूंना कायम ठेवण्याचा विशेषाधिकार देण्यात आला आहे. याचप्रमाणे याच विशेषाधिकाराने आपल्या संघातील काही खेळाडूंचा लिलाव थांबवून त्यांना संघात स्थान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
१२ फेब्रुवारीला होणाऱ्या या लिलावासाठीची नियमावली सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आली. या महत्त्वपूर्ण  बैठकीमध्ये खेळाडूंच्या करारासंदर्भातील नियम, संघरचना आणि लिलावाआधी खेळाडूंना संघात कायम ठेवण्याबाबतचे नियम ठरवण्यात आले. या लिलावाचे स्थळ नंतर घोषित करण्यात येणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. ‘
‘प्रत्येक फ्रेंचायझीला २०१३च्या खेळाडूंपैकी जास्तीतजास्त पाच जणांना संघात स्थान देता येईल. ते संघाकडून सामने खेळलेले असो किंवा नसो. यापैकी चारपेक्षा अधिक खेळाडू भारताकडून खेळलेले नसावेत,’’ असे बीसीसीआयने नमूद केले आहे.

संघाची रचना
*  प्रत्येक संघात १६ पेक्षा कमी आणि २७ पेक्षा अधिक खेळाडू नसावेत. यापैकी ९ खेळाडू परदेशी असावेत.
*  कोणत्याही सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये चारपेक्षा अधिक परदेशी खेळाडू नसावेत.
*  स्थानिक खेळाडूंना संघात देण्याबाबत कोणतीही विशेष तरतूद नाही.
*  आयपीएलशी करारबद्ध होण्यापूर्वी १९-वर्षांखालील क्रिकेटपटूंनी प्रथम श्रेणी किंवा ‘अ’ दर्जाचे क्रिकेट सामने खेळलेले असावेत.
आयपीएल लीगचे शुल्क म्हणजे मानधन म्हणून २०१४च्या वर्षांसाठी ६० कोटी रुपये खेळाडूंना देता येतील. २०१५ आणि २०१६ या वर्षांसाठी ही रक्कम पाच टक्क्यांनी वाढेल.
*  २०१४, १५ आणि १६ या वर्षांसाठी प्रत्येक संघ किमान ३६ कोटी रुपये खर्च करू शकेल.

खेळाडूंचा करार
*  खेळाडूंचा करार हा एक वर्षांच्या कालमर्यादेचा असेल. त्यानंतर त्यांना एक किंवा दोन वर्षांसाठी हा काळ वाढवता येईल. प्रत्येक वर्षी १५ डिसेंबरपूर्वी हा कार्यकाळ वाढवण्याची तरतूद संघांना करावी लागेल.
*  खेळाडूंना देण्यात येणारे आयपीएलचे मानधन हे भारतीय रुपयांमध्ये असेल.
*  परदेशी खेळाडूंना ही रक्कम त्यांच्या पसंतीच्या चलनात देण्यात येईल. मानधन देण्याची तारीख किंवा करारबद्ध होण्याची तारीख जी खेळाडूंना अनुकूल असेल, ती चलनाच्या विनिमय दरासाठी ग्राह्य़ मानण्यात येईल.
*  आयपीएलच्या मानधनात चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचा समावेश नाही, परंतु त्यांना सहा मैत्रीपूर्ण लढती खेळाव्या लागतील.
*  चॅम्पियन्स लीगच्या सामन्यांसाठी आयपीएल लीगच्या सामन्यांच्या दहा टक्के रकमेइतके अतिरिक्त मानधन देण्यात येईल.

लिलावाआधी संघाकडे कायम राखता येणाऱ्या खेळाडूंसाठी नियम
*  २०१४ लिलावापूर्वी फ्रेंचाइजी प्रत्येकी कमाल ५ खेळाडूंना करारबद्ध करू शकतात. (यामध्ये संघाचे प्रतिनिधित्व केलेले, न केलेले यांचा समावेश असू शकतो. २०१३ हंगामात हे खेळाडू संघाचा भाग असणे आवश्यक आहे, यामध्ये हंगामात अनुपलब्ध असणाऱ्या आणि तात्पुरते संघाचा भाग असणाऱ्या खेळाडूंचा समावेश असेल.)
*  खेळाडू आणि फ्रेंचायझी या दोघांच्या स्वाक्षऱ्या असलेले खेळाडूचे करारपत्र बीसीसीआयला १० जानेवारी २०१४पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे.
*  ११ जानेवारी २०१४पर्यंत फ्रेंचायझींना २०१३च्या हंगामात अन्य फ्रेंचायझींच्या संघात असणाऱ्या खेळाडूंशी चर्चा करण्याची अनुमती नाही.
*  आयपीएल लीग शुल्काव्यतिरिक्त, खेळाडूच्या करारपत्रात ठरल्याप्रमाणे फ्रेंचायझी आणि खेळाडू यांच्यात निश्चित झाल्याप्रमाणे २०१४च्या हंगामासाठी शुल्कावर मर्यादा खालीलप्रमाणे असतील-
संघात कायम राखण्यात आलेल्या प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंसाठी मानधन
* पहिल्या खेळाडूला १२.५ कोटी
* दुसऱ्या खेळाडूला ९.५ कोटी
* तिसऱ्या खेळाडूला ७.५ कोटी
* चौथ्या खेळाडूला ५.५ कोटी
* पाचव्या खेळाडूला ४ कोटी
संघात कायम राखण्यात आलेल्या प्रतिनिधित्व न केलेल्या खेळाडूंसाठी मानधन
प्रत्येकी ४ कोटी
*  ज्या फ्रेंचायझीने संघात प्रतिनिधित्व केलेल्या पाच खेळाडूंना कायम ठेवले असेल, त्या फ्रेंचायझीकडे अन्य खेळाडूंच्या खरेदीसाठी २१ कोटी रुपये उपलब्ध असतील.

लिलावाचे नियम
*  १२ फेब्रुवारीला आयपीएलचा लिलाव होईल आणि गरज पडल्यास १३ फेब्रुवारी हा अतिरिक्तदिवस असेल.
*  आयपीएलच्या संघांनी राखून ठेवलेले खेळाडू वगळल्यास २०१४च्या आयपीएल स्पध्रेत खेळू इच्छिणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मग तो आयपीएल खेळलेला अथवा न खेळलेला असो, भारतीय अथवा परदेशी असो किंवा २०१३च्या आयपीएलमध्ये खेळलेला अथवा न खेळलेला असो.
*  २०१३मध्ये झालेल्या खेळाडूंच्या लिलावाप्रमाणेच यावर्षीसुद्धा ही प्रक्रिया चालेल. २०१३च्या संघातील जितके खेळाडू कायम राखण्याचा निर्णय फ्रेंचायझी घेईल, त्यानुसार त्यांना लिलावाप्रसंगी आपल्या काही खेळाडूंना थांबवण्याचा विशेषाधिकार असेल.
लिलावाआधी संघात ठेवलेले खेळाडू      खेळाडू थांबवण्याचा अधिकार
    ५                १
    ४                १
    ३                १
    २                २
    १                २
    ०                ३