भारतीय तिरंदाज शाहझार रिझवी याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय तिरंदाजी फेडरेशनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. कोरिया येथे नुकत्याच पार पडलेल्या तिरंदाजी विश्वचषकात १० मीटर एअर पिस्टल प्रकारात त्याने रौप्यपदक पटकावले. या कामगिरीमुळे १६५४ रेटिंग पॉईंट्ससह शाहझार जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला. त्याने रशियाच्या आर्टम चेर्नोसोव्ह (१०४६) आणि जपानच्या टोमोयुकी मत्सुदा (८०३) यांना मागे टाकले.

शाहझारने या आधी मार्चमध्ये मेक्सिकोत झालेल्या विश्वचषकात विश्वविक्रम करत सुवर्ण पदक पटकावले होते. शाहझार व्यतिरिक्त ‘टॉप १०’मध्ये जितू राय या भारतीय तिरंदाजाचा समावेश आहे. तर ओम प्रकाश मिठरवाल याला १२व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

१० मीटर एअर रायफल प्रकारात ‘टॉप १०’मध्ये भारताचा रवी कुमार चौथ्या आणि दीपक कुमार नवव्या स्थानी पोहोचला आहे. तर ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स या प्रकारात ‘टॉप १०’मध्ये भारताचा अखिल शेओरान चौथ्या आणि संजीव राजपूत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

महिला तिरंदाजांच्या जागतिक क्रमवारीत भारताची मनू भाकेर ही केवळ एकमेव खेळाडू आहे. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये मनूने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्या कामगिरीच्या जोरावर तिने क्रमवारीत चौथे स्थान पटकावले. १० मीटर एअर रायफल प्रकारात ‘टॉप १५’मध्ये राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत रौप्यपदक पटकावलेली मेहुली घोष सातव्या, अपुर्वी चंडेला ११व्या तर अंजुम मौदगील १२व्या स्थानावर आहे. अंजुम ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स या प्रकारातही आठव्या स्थानी आहे.