भारताच्या रायफल, पिस्तूल आणि शॉटगन नेमबाज यांना पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. गबाला, अझरबैजान येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरी करून ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त जागा पटकावण्याचे लक्ष्य भारतीय नेमबाजांसमोर आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत भारताचा मजबूत संघ दाखल झाला असून त्यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या अभिनव बिंद्रा, गगन नारंग आणि जितू राय यांच्यासह अपूर्वी चंडेला आणि गुरप्रित सिंग यांचा समावेश आहे. या पाचही नेमबाजांनी ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे या स्पध्रेत हिना सिधू, मानवजीत सिंग संधू, विजय कुमार, अयोनिका पॉल, चैन सिंग, अंकुर मित्तल आणि मोह. असाब यांना ऑलिम्पिक पात्रता मिळवण्याची संधी आहे. एअर पिस्तूल पुरुष व महिला प्रकारात व एअर रायफल पुरुष व महिला प्रकारात प्रत्येकी तीन खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवू शकतात.