भारतीय व्यक्तींना व्हिसा नाकारण्याच्या अमेरिकेच्या अजब धोरणाचा फटका भारतीय पिस्तूल नेमबाजांना बसणार आहे. ४ ते १३ मे या कालावधीत अमेरिकेतील फोर्ट बेनिंग येथे नेमबाजी विश्वचषक सुरू आहे. या विश्वचषकात भारतीय पिस्तूल नेमबाजपटूही सहभागी झाले आहेत, मात्र त्यांना आपल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय खेळावे लागणार आहे. भारताचे पिस्तूल प्रकाराचे नेमबाजी प्रशिक्षक सय्यद वाजिद अली यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला आहे. दरम्यान, व्हिसा नाकारण्यासाठीचे कोणतेही कारण अमेरिकेच्या वकिलातीने दिले नसल्याचे भारतीय राष्ट्रीय नेमबाजीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
व्हिसा नाकारण्यात आला आहे, तसेच सय्यद यांचा पासपोर्टही अद्याप परत मिळाला नसल्याचे राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचे सल्लागार बलजीत सिंग सेठी यांनी सांगितले.
अन्य प्रकारांचे प्रशिक्षक या स्पर्धेदरम्यान उपस्थित असतील, मात्र सय्यद यांना उपस्थित राहता येणार नाही. पिस्तूल नेमबाजांचे या निर्णयामुळे नुकसान होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा नेमबाजपटूंना निश्चित उपयोग झाला असता असे त्यांनी पुढे सांगितले.
सामान्यत: चार प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाते आणि हे सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान नेमबाजपटूंना मार्गदर्शनासाठी हजर असतात. सय्यद यांना व्हिसा नाकारणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. ते प्रशिक्षक म्हणून गेले काही महिने कार्यरत असून, प्रशिक्षक म्हणून याआधी अनेक देशांचा दौरा त्यांनी केला असल्याचे सिंग यांनी पुढे सांगितले.
यासंदर्भात सय्यद यांना व्हिसासाठी मंजुरी मिळावी यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या वकिलातीला पत्राने कळवलेही होते. मात्र तरीही सय्यद यांना व्हिसा मंजूर झाला नाही.
अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेत महिलांमध्ये अन्नू राज सिंग, हीना सिधू, तर पुरुषांमध्ये अमनप्रीत सिंग, जितू राय, प्रकाश नानजप्पा आणि ओमप्रकाश सहभागी होणार आहेत.