भारत-श्रीलंका तिसरा ट्वेन्टी-२० सामना आज

पुण्यातल्या हिरव्यागार खेळपट्टीवर भंबेरी उडालेल्या भारतीय संघाने रांचीच्या सपाट खेळपट्टीवर पराभवाचा बदला घेत बरोबरी केली. या सामन्यानंतर अवघ्या दीडच दिवसात भारतीय संघ विशाखापट्टणमच्या मैदानात मालिका विजयाच्या ध्येयाने उतरणार आहे. प्रमुख खेळाडूंविना खेळणाऱ्या श्रीलंकेला नमवत आशिया चषक आणि विश्वचषकासाठी सज्ज होण्यासाठी भारतीय संघ आतुर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिकेत निर्भेळ यश साकारणारा भारतीय संघ सलग दुसऱ्या ट्वेन्टी-२० मालिका विजयासाठी प्रयत्नशील आहे.

रांचीत शिखर धवनने ट्वेन्टी-२० कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या अर्धशतकाची नोंद केली. भारतीय खेळाडूंतर्फे ट्वेन्टी-२० प्रकारातील वेगवान अर्धशतकांमध्ये या खेळीचा समावेश झाला. शिखरला सूर गवसल्याने भारतीय संघाची चिंता मिटली आहे. त्याच्यासह रोहित शर्मावर दमदार सलामी देण्याची जबाबदारी आहे. अजिंक्य रहाणेला संघातील स्थान टिकवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. सुरेश रैना आणि युवराज सिंग हे अनुभवी वीर मोठी खेळी करण्यासाठी तयार आहेत. महेंद्रसिंग धोनीची शेवटच्या षटकांत फटकेबाजीची क्षमता निर्णायक ठरू शकते. हार्दिक पंडय़ाने रांचीत आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली होती.

गोलंदाजीत रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा ही जोडगोळी अफलातून कामगिरी करत आहे. अनुभवी आशीष नेहरा आणि युवा जसप्रीत बुमराह यांनी धावा रोखताना विकेट्स मिळवण्याचे कौशल्यही जपले आहे. पंडय़ा, युवराज आणि रैना यांनी पाचव्या गोलंदाजाची उणीव भरून काढली आहे. भारतीय संघव्यवस्थापन दुसऱ्या सामन्यातील संघच कायम ठेवण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेसाठी फलंदाजी काळजीचा मुद्दा आहे. अनुभवी दिलशानकडून तडाखेबंद खेळीची अपेक्षा आहे. चामरा कपुगेडरा आणि दिनेश चंडिमल यांच्याकडून संयमी खेळीची आवश्यकता आहे. युवा फलंदाजांची फिरकीसमोर त्रेधातिरपीट उडते आहे. होणाऱ्या चुकांतून बोध घेत त्यांनी खेळात सुधारणा करण्याची गरज आहे. रांचीत हॅट्ट्रिक घेणारा थिसारा परेरा फलंदाजीत उपयुक्त ठरू शकतो. सचित्र सेनानायके आणि सीकुगे प्रसन्ना हे फिरकीपटू भारतीय फलंदाजांना त्रासदायक ठरू शकतात. दुश्मंत चमीरा, कसून रंजीता आणि दासून शनका हे वेगवान त्रिकूट श्रीलंकेसाठी जमेची बाजू आहे.

विशाखापट्टणमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरण्याचीच शक्यता आहे. मात्र सामना कृत्रिम प्रकाशात होणार असल्याने, दवाचा मुद्दा लक्षात घेत धोनी नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णयही घेऊ शकतो.

संघ :

भारत- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, पवन नेगी, मनीष पांडे, आशीष नेहरा, भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंग.

श्रीलंका- दिनेश चंडिमल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दुश्मंत चमीरा, निरोशन डिकवाला, तिलकरत्ने दिलशान, बिनुरा फर्नाडो, दिलहारा फर्नाडो, असीला गुणरत्ने, दानुष्का गुणतिलका, चामरा कपुगेडरा, थिसारा परेरा, सीकुगे प्रसन्ना, कसून रंजिता, सचित्र सेनानायके, दासुन शनका, मिलिंदा सिरीवर्दना, जेफ्री वँडरसे.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी वाहिन्यांवर

वेळ : रात्री ७.३० पासून