रशिनय खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत भारतीय खेळाडूंनी आपली छाप सोडताना महिला एकेरी व मिश्र दुहेरीचे जेतेपद नावावर केले. महिला एकेरीत ऋत्विका शिवानीने स्थानिक खेळाडू एव्हगेनिया कोसेत्स्कायाचा २१-१०, २१-१३ असा अवघ्या २६ मिनिटांत पराभव केला, तर मिश्र दुहेरी सिक्की रेड्डी व प्रणव चोप्रा या जोडीने व्हॅदिमिर इव्हानोव्ह आणि व्हॅलेरिया सोरोकिना या जोडीचा २१-१७, २१-१९ असा पराभव करून जेतेपद पटकावले. पुरुष एकेरीत भारताच्या सिरिल वर्माला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मलेशियाच्या झुल्फादली झुल्कीफ्फीने अटतटीच्या सामन्यात सिरिलवर १६-२१, २१-१९, २१-१० असा विजय मिळवला.

 

सांगली सलग सहाव्या जेतेपदासाठी सज्ज

मिरज : पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पध्रेत पुरुष विभागात सांगली विरुद्ध पुणे, तर महिलांमध्ये ठाणे विरुद्ध रत्नागिरी अशा अंतिम लढती रंगतील. पुरुष गटात सांगलीला सलग सहावे जेतेपद पटकावण्याची संधी आहे. महिला गटातील उपांत्य फेरीच्या सामन्यात गतउपविजेत्या रत्नागिरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या ऐश्वर्या सावंतच्या धडाकेबाज खेळाच्यामुळे उस्मानाबाद संघावर ८-७ असा सहा मिनिटे शिल्लक असताना १ गुणाने पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या ठाणे संघाने पुणे संघाचा १४-८ असा पराभव केला. प्रियांका भोपीने पहिल्या डावात तर पौर्णिमा सकपाळने दुसऱ्या डावात प्रत्येकी ४ मिनिटे वेळ नोंदवून संरक्षणाची बाजू सांभाळली .