भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंह सोशल मीडियावर आपल्या खास शैलीसाठी ओळखला जातो. गेल्या काही काळापासून तो भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र, सध्याच्या अनेक मुद्द्यांवर पंजाबी स्टाईलने मत व्यक्त करत असल्यामुळे तो कायमच नेटिझन्सच्या चर्चेचा विषय राहिला आहे.

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडून संपू्र्ण देशभरात जीएसटी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र, या जीएसटीचा हरभजन सिंहला चांगलाच फटका बसल्याचं दिसतंय. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या हरभजनला जेव्हा बिल देण्यात आलं, त्यावर आकारलेल्या जीएसटीची रक्कम पाहुन या फिरकीपटूने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सरकारच्या निर्णयावर मार्मिक टीका केली.

रेस्टॉरंटमध्ये जेवून झाल्यावर बिल देताना जीएसटीची रक्कम पाहिली आणि केंद्र व राज्य सरकारही आमच्या सोबत जेवून गेलं की काय, असा उपरोधिक सवाल त्याने उपस्थित केला. राज्य आणि केंद्र सरकारतर्फे प्रत्येकी ९ % लावण्यात येणाऱ्या जीएसटी करावर हरभजनने आपल्या खुमासदार शैलीत भाष्य केलं. काही नेटीझन्सनी हरभजनच्या या ट्विटला आपला पाठिंबा दर्शवला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या वन-डे मालिकेवरही हरभजनने ट्विटर अकाऊंटवर भाष्य केलं होतं. सध्या आंतराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब असलेला हरभजन सिंह फक्त राष्ट्रीय आणि आयपीएल सामन्यांमध्ये खेळतो.