जिम्नॅस्टिक्सकरिता राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त महासंघाच्या अनुपस्थितीत खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) सात सदस्यांची उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व आशियाई क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी होणार आहेत. या स्पर्धाकरिता आतापासूनच संभाव्य खेळाडूंची निवड करण्यासाठी व त्यांच्या प्रशिक्षणाकरिता विविध योजना राबविण्याची जबाबदारी साईने या समितीद्वारे उचलली आहे. साईचे महासंचालक जिजी थॉम्पसन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत राम निवास (शासकीय निरीक्षक), जी.एस.बावा (एनआयएसचे माजी मुख्य प्रशिक्षक), डॉ.डी.के.राठोड (राष्ट्रीय प्रशिक्षक), डॉ.कल्पना देवनाथ (अर्जुन पुरस्कार विजेत्या प्रशिक्षक), रूपाली सिंग (अर्जुन पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ खेळाडू), राधिका श्रीमल व रॉकी डायस (साई) यांचा समावेश आहे.
या समितीने संभाव्य खेळाडूंची नावे निश्चित केली असून या खेळाडूंसाठी नवी दिल्ली, ग्वाल्हेर, कोलकाता व पतियाळा येथे प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे.