भारताची धावपटू द्युती चंद हिने रविवारी आपण समलिंगी जोडीदारासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे स्पष्ट केले. काही वर्षांपासून ओळख असलेल्या तिच्याच शहरातील एका मुलीसोबत ती रिलेशनशीपमध्ये असल्याचे तिने जाहीरपणे सांगितले. १०० मीटर शर्यतीत विक्रम नोंदवणारी व २०१८ मधील आशियाई स्पर्धेत दोन रौप्य पदक मिळवणारी द्युती आपले समलैगिंक संबंध असल्याचे सांगणारी पहिली भारतीय क्रीडापटू ठरली. मात्र, द्युतीने काही कारणांसाठी आपल्या जोडीदाराची ओळख लपवली.

द्युतीने आपले समलिंगी संबंध असल्याचे जाहीर केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना ही बाब रुचली नाही. द्युतीच्या कुटुंबीयांनी तिला या गोष्टीमुळे धमकीही दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत होते. याबाबत द्युतीने स्वतः मौन सोडले आहे. “मी समलिंगी संबंधांबद्दल जाहीरपणे बोलल्यानंतर माझ्या बहिणीने मला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. माझ्या भावाबरोबरही तिने असेच केले आहे, कारण माझ्या भावाच्या पत्नीशी तिचे पटत नाही. पण मी माघार घेणार नाही. मी सज्ञान आहे’, असे तिने स्पष्टपणे सांगितले.

“तिला जे हवं ते तिने करावं, पण मी मात्र आता मागे हटणार नाही. मी माघार न घेण्यामागे २ महत्वाची कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे मी यात काहीही चुकीचं केलेलं नाही. आणि दुसरं कारण म्हणजे मला समलिंगी संबंधांमध्ये असल्याबाबत अजिबात वाईट वाटत नाही किंवा लाज वाटत नाही. उलट मी अभिमानाने सांगते की मी समलिंगी संबंधांमध्ये आहे”, असेही ती म्हणाली.

द्युतीची मोठी बहीण सरस्वती चंद यांनी मात्र याबाबत वेगळी माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार द्युतीची समलिंगी जोडीदार हिने द्युतीला ब्लॅकमेल केले असून मालमत्ता आणि पैशासाठी तिने द्युतीवर दबाव टाकला. त्यामुळे द्युतीची मोठी बहीण या संबंधांना विरोध करत आहे.

“माझा विश्वास आहे की प्रत्येकाने ठरवले असेल, त्याच्याबरोबर राहण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. मी समलैंगिक संबंध असलेल्या व्यक्तींच्या हक्कांचे नेहमीच समर्थन केले आहे. तो त्यांचा वैयक्तिक व्यक्ती निवडीचा भाग आहे”, असे तिने आधीच स्पष्ट केले होते. दरम्यान, द्युती सध्या जागतिक विजेतेपदासाठी व पुढील वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कठोर परिश्रम घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ बाबत गेल्या वर्षी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर आपण ‘एलजीबीटी’ समुदायाच्या हक्कांसह स्वतःच्या समलैगिंक संबंधाबाबत बोलण्याचे धाडस एकवटवले होते, असेही द्युतीने सांगितले.