आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय, ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे आणि अष्टपैलू वेदा कृष्णमूर्ती यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय तसेच ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघातून वगळण्यात आले आहे. याचप्रमाणे किशोरवयीन शफाली वर्माला एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ७ मार्चपासून लखनौ येथे प्रारंभ होणार असून त्यानंतर अनुक्रमे २०, २१ आणि २३ मार्चला तीन ट्वेन्टी-२० लढती खेळवण्यात येतील. या दोन्ही मालिकांसाठी शनिवारी नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भारतीय संघाची निवड केली. मिताली राज एकदिवसीय, तर हरमनप्रीत कौर ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

गतवर्षी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात १७ वर्षीय शफालीने धडाकेबाज फलंदाजीसह भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे तिला एकदिवसीय संघातही स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. त्याव्यतिरिक्त झुलन गोस्वामीच्या नेतृत्वाखाली युवा गोलंदाजांना खेळण्याची अधिक संधी मिळावी, या हेतूने शिखाला वगळण्यात आले आहे. वेदाला गेल्या दोन वर्षांतील सुमार कामगिरीमुळे एकाही संघात स्थान लाभलेले नाही. दरम्यान, आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेद्वारे भारतीय महिला संघ तब्बल वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

भारतीय महिला संघ

’ एकदिवसीय मालिकेसाठी : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम राऊत, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया, दयालन हेमलता, दीप्ती शर्मा, सुष्मा वर्मा (यष्टीरक्षक), श्वेता वर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रत्युषा, मोनिका पटेल.

’ ट्वेन्टी-२० मालिकेसाठी : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, सुष्मा वर्मा, नुझत परवीन, आयुषी सोनी, अरुंधती रेड्डी, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, मानसी जोशी, सी. प्रत्युषा, मोनिका पटेल, दिल बहादूर.