भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने शानदार प्रदर्शन करत भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक ठेवले आहे. पोलंड ओपनमध्ये ५३ किलो वजनी गटात शुक्रवारी झालेल्या सामन्यात विनेशने विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकामुळे तिची टोकियो ऑलिम्पिकची तयारी योग्य दिशेने चालली आहे, हे दिसून येते.

यंदा होणाऱ्या ऑलिम्पिकपूर्वी विनेशला जास्त सराव करता आलेला नाही. २६ वर्षीय विनेशचे हे हंगामातील तिसरे विजेतेपद आहे. मार्चमध्ये मॅटिओ पेलिकोन आणि एप्रिलमध्ये आशियाई स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले. या विजयामुळे विनेश टोकियो ऑलिम्पिकमधील अव्वल मानांकित कुस्तीपटू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ‘इंग्लंडमध्ये खेळतोयस तर ‘‘या” गोष्टीचा आदर कर’

२०१९च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी ईकाटेरिना पोलीशच्यूक वगळता विनेशला तिच्या कोणत्याही प्रतिस्पर्ध्याकडून जास्त त्रास झाला नाही. तिने अंतिम सामन्यात युक्रेनच्या बेरेझा विरूद्ध एकही गुण गमावला नाही आणि ८-० असा विजय नोंदविला. २०१९च्या युरोपियन स्पर्धेतील रौप्यपदक विजेती बेरेजा सामन्यात बचावात्मक पद्धतीने खेळत होती. भारताच्या अंशु मलिकला तापामुळे ५७ किलो वजनी गटात स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

हेही वाचा – दंगल गर्ल : विनेश फोगट

विनेशने सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या अ‍ॅमी अ‍ॅन फीअर्नसाइडला ७५ सेकंदांत नामोहरम केले. मग २०१९च्या जागतिक कांस्यपदक विजेत्या ईकाटेरिना पोलीशच्यूकला नमवले.