News Flash

कुटुंबवत्सल प्रशिक्षक बेर्गामास्को भारताच्या यशाचे शिल्पकार

सहा वर्षांपूर्वीची दोन सुवर्ण व दोन कांस्य ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.

जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पध्रेत भारताने सर्वोत्तम कामगिरीची नोंद करून जगाचे लक्ष वेधले. या यशामागे खेळाडूंचा जितका वाटा आहे, त्याहून अधिक मुख्य प्रशिक्षक राफेल बेर्गामास्को यांचा आहे. त्यांच्यात आणि खेळाडूंमध्ये इतक्या कमी कालावधीत चांगले ऋणानुबंध निर्माण झाले होते. विजयानंतर खेळाडूंनी प्रशिक्षकांना मारलेली मिठी हा स्टेडियममधील क्रीडारसिकांना भावनिक करणारा क्षण ठरला.

सहा वर्षांपूर्वीची दोन सुवर्ण व दोन कांस्य ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. रविवारी भारताने पाच सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांची लयलूट केली. या यशाचे शिल्पकार असलेले बेर्गामास्को हे फक्त एक मार्गदर्शक नव्हे, तर कुटुंबप्रमुखाप्रमाणे खेळाडूंशी आपुलकीने वागतात. घरच्यांची आठवण येऊ नये, यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये न राहता खेळाडूंसोबत एका अतिथिगृहात राहणे त्यांनी पसंत केले. याबाबत ते म्हणतात, ‘‘कुटुंब या संकल्पनेवर माझा दृढ विश्वास आहे. बॉक्सिंग हा वैयक्तिक खेळ आहे, परंतु सराव करताना आम्ही एकत्र असतो. त्या वेळी प्रत्येक जणी एकमेकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम करतात. या मुली आपल्या कुटुंबीयांपासून दोन-तीन महिने दूर राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांना घरच्यासारखे वाटावे म्हणून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.’’

उत्तम संवादासाठी हिंदीची शिकवणी

महिला बॉक्सिंगपटूंसाठी प्रथमच परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. त्या वेळी भाषा, संस्कृती, जीवनशैली, राहणीमान आदी आव्हाने त्यांच्यासमोर होतीच. त्यावर मात करत त्यांनी भारताला मिळवून दिलेले यश कौतुकास्पद आहे. नमस्ते, नमस्कार, आप कैसे हो? हे त्यांच्या तोंडून ऐकताना आश्चर्य वाटते; पण भारतीय खेळाडूंशी जुळवून घेण्यासाठी ते इंग्रजीसह हिंदी भाषाही शिकले. याविषयी ते म्हणाले, ‘‘खेळाडूंना शिकवण्यासाठी मला त्यांची भाषा येणे गरजेचे होते. ती मी शिकलो. भारतीय खेळाडूंमध्ये प्रचंड ताकद आहे. ते मनानेही मजबूत आहेत; पण खेळताना ते विचार करत नाहीत. रिंगमध्ये उतरायचे आणि ठोसे मारायचे, इतकेच त्यांना माहीत आहे. बचाव, पदलालित्यबाबत अधिक माहिती नव्हती, त्यावर मी मेहनत घेतली आणि निकाल तुमच्या समोर आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 12:45 am

Web Title: indian success of world youth women boxing competition coach raffaele bergamasco
Next Stories
1 पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय
2 श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, विराटला विश्रांती; रोहित शर्मा भारताचा नवीन कर्णधार
3 नागपूरच्या खेळपट्टीविषयी विराटने व्यक्त केली नाराजी
Just Now!
X