माजी विजेत्या कोलकाता आणि केरळ यांच्यात पाचव्या हंगामाची सलामी

भारतीय फुटबॉलला उगवते तारे देण्याच्या उद्देशाने चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलचे पाचवे पर्व शनिवारपासून सुरू होत आहे. दोन वेळचे विजेते अ‍ॅटलेटिको डी कोलकाता आणि दोन वेळचे उपविजेते केरळ ब्लास्टर्स एफसी हे संघ पहिल्या सामन्यात एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.

आयएसएलच्या पाचव्या पर्वात १० संघांचा समावेश असून यंदा ही स्पर्धा सहा महिन्यांपर्यंत लांबवण्यात आली आहे. तब्बल ५९ सामने साखळी फेरीत खेळले जाणार असून यामध्ये तीन विश्रांतीचे टप्पेही असणार आहेत. ८ ते १६ ऑक्टोबर आणि १२ ते २० नोव्हेंबरदरम्यान भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी अनुक्रमे पहिला व दुसरा टप्पा, तर १७ डिसेंबरपासून २०१९च्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीकरता विश्रांतीचा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. त्याशिवाय मागील चार पर्वाप्रमाणे आठवडय़ाअखेरीस प्रत्येक दिवशी दोन सामने खेळवण्याच्या रचनेतही बदल करण्यात आले असून दररोज एकच सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वा. खेळवण्यात येणार आहे.

कोलकाता आणि केरळ यांना गेल्या हंगामात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. मात्र यंदा त्या कामगिरीत सुधारणा करण्याचे दोन्ही संघांचे मनसुबे असतील. प्रशिक्षक स्टीफन कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या कोलकाताने २०१४ व २०१६च्या अंतिम फेरीत केरळलाच धूळ चारली होती. मात्र यंदा डेव्हिड जेम्स यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणारा केरळ वचपा काढण्यासाठी उत्सुक असेल.

  • सामन्याची वेळ : सायं. ७:३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ व ३