News Flash

इंडियन सुपर लीग स्पर्धा : गतविजेत्यांचा उत्साह बुलंद!

बॉलीवूड तारकांच्या नाचगाण्याने आयएसएलच्या दुसऱ्या सत्राचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

कोलकाताची सलामी यजमान चेन्नईयन क्लबशी

भारतीय फुटबॉलला जागतिक स्तरावर एक वेगळी उंची मिळवून देणाऱ्या इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) दुसऱ्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. बॉलीवूड तारकांच्या नाचगाण्याने आयएसएलच्या दुसऱ्या सत्राचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणारा गोल‘धडाका’ पाहण्यासाठी साऱ्यांच्याच नजरा आतुरलेल्या आहेत. स्पध्रेच्या सलामीच्या लढतीत गतविजेता अ‍ॅटलेटिको डी कोलकाता आणि यजमान चेन्नईयन हे भिडणार असल्यामुळे फुटबॉल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. गतविजेते बुलंद हौसल्याने चेन्नईयनचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या हंगामात संघात अनेक बदल झाल्यामुळे आणि युवा खेळाडूंचा भरणा झाल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक आक्रमकता, अधिक जोश अनुभवायला मिळणार आहे.

‘‘पहिल्या जेतेपदाचा मान आम्ही पटकावला आहे आणि तो आमच्याकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाही,’’ कोलकाता क्लबचा सहसंघमालक सौरव गांगुली याची ही प्रतिक्रिया संघातील खेळाडूंच्या आत्मविश्वासाचे बोलके प्रतीक आहे. कोलकातानेही आत्मविश्वासाने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवल्याने चेन्नईला घरच्या मैदानावरील हा पेपर तितकासा सोपा जाणार नाही हे निश्चित. अचूक पास, अभेद्य बचाव आणि मोक्याच्या क्षणी गोल करण्याचे कसब दाखविणारे खेळाडू.. कोलकाता क्लबच्या या मजबूत फळीमुळेच त्यांनी आयएसएलचा पहिला हंगाम गाजवला. आयएसएलच्या दुसऱ्या हंगामाकरिता संघात फार बदल न करता कोलकाताने विजयरथावर स्वार झालेल्या खेळाडूंवर विश्वास दाखविला आहे. जोसेमी, ऑफ्टेंसे नाटो आणि बोर्जा फर्नाडिस या विदेशी खेळाडूंसह सात खेळाडूंना संघात कायम राखले आहे. तसेच त्यांनी मध्यरक्षक अराता इजुमी आणि बचावपटू रिनो अँटो यांना आपल्या चमूत दाखल करून घेत मजबूत संघबांधणी केली आहे. जपानच्या इजुमीसाठी त्यांनी ६८ लाख, तर लिलावात सर्वात कमी मूळ किंमत (१७.५ लाख) असलेल्या अँटोसाठी त्यांनी चक्क ९० लाख मोजले. गोलरक्षक जुआन कॅलाटायूड, बचावपटू जोसेमी, मध्यरक्षक बोर्जा आणि आघाडीपटू हेल्डर पोस्टीगा हे कोलकाताचे हुकमी एक्के आहेत. त्यात अर्नब मोंडलही गतवर्षीचा करिश्म्याच्या पुनरावृत्तीसाठी सज्ज आहे. त्यामुळे सर्वच आघाडीवर कोलकाता भारी दिसत आहे. अ‍ॅटोनिओ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता आक्रमक रणनीती घेऊनच मैदानात उतरणार आहे.

दुसरीकडे चेन्नईयनही युवा खेळाडूंची फौज घेऊन आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोलकाताचा फिकरू चमूत दाखल झाल्यामुळे चेन्नईयनची ताकदही वाढली आहे. त्याच्या जोडीला एलानो ब्लमर, बेरनार्ड मेंडी, हरमनजोत खाब्रा व अभिषेक दास हे खेळाडू असल्यामुळे चेन्नई कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे पलटवण्याची क्षमता राखतो. गतवर्षी जेतेपदाच्या शर्यतीत चेन्नईयनला उपांत्य फेरीत केरला ब्लास्टरकडून पराभव पत्करावा लागला होता. ब्लमर, स्टीव्हन मेंडोजा मेंडी व ब्रुनो पेलिसारी या विदेशी खेळाडूंना संघात कायम राखून त्यात एडेल बेटे व फिकरू टेरेफा यांची भर घालून चेन्नईयनने मजबूत संघबांधणी केली आहे.

गतवर्षी आम्ही सर्वात शेवटी संघबांधणी केली, तरीही अव्वल चौघांत स्थान पटकावले. ही कामगिरी अभिमानास्पद होती. यंदा आमचा संघ समतोल आहे आणि जेतेपद पटकावण्याच्या निर्धारानेच स्पध्रेत सुरुवात करणार आहे. पहिलाच सामना गतविजेत्यांशी आहे आणि याहून चांगली सुरुवात होऊच शकत नाही.

– मार्को मॅटेराज्जी, चेन्नईयन एफसी प्रशिक्षक

आमचा संघ सर्वोत्तम दिसत आहे, परंतु प्रत्यक्ष मैदानात त्यांची कामगिरी कशी होते, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. खेळाडूंची वागणूक, कामगिरी आणि समर्पण यामुळे सामना सहज जिंकू शकतो. गतविजेतेपद हा भूतकाळ आहे. प्रत्येक सामन्यात तीन गुण मिळवत आगेकूच करायची, हेच ध्येय आहे.

– अँटोनिओ लोपेज हबास, अ‍ॅटलेटिको डी कोलकाता प्रशिक्षक

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नईयन एफसी – गोलरक्षक : अपोला एडीमा एडेल बेटे, करनजीत सिंग, निधिनलाल; बचावपटू : अभिषेक दास, अलेसांड्रो पोटेजा, बेरनार्ड मेंडी, धनचंद्रा सिंग, एडर माँटेएरो फर्नाडिस, जस्टीन स्टीफन, लाल्हमंगेहसंगा राल्टे, मैलसन अ‍ॅल्व्हेस, मेहराजुद्दीन वडू; मध्यरक्षक : ब्रुनो पेलीसारी, धनपाल गणेश, एलानो ब्लमर, गॉडवीन फ्रांसो, हरमनजोत खाब्रा, मॅन्युएल ब्लासी, राफेल ऑगस्टो, थॉय सिंग, जाकीर मुंदांपरा; आघाडीपटू : बलवंत सिंग, फिकरू टेरेफा लेमेस्सा, जयेश राणे, जेजे लाल्पेखलुआ, जॉन स्टिव्हन मेंडोझा व्हॅलेंसिआ.

अ‍ॅटलेटिको डी कोलकाता – गोलरक्षक : अमरिंदर सिंग, जुआन कॅलाटायूड, कुंझांग भुतिआ; बचावपटू : अर्नब मोंडल, ऑगस्टीन फर्नाडिस, डेंझिल फ्रांसो, जोसेमी, लाल्छावांकीमा, नल्लप्पन मोहनराज, रिनो अँटो, सयद रहिम नबी, टिरी; मध्यरक्षक : अराता इजुमी, बोर्जा फर्नाडिस, क्लिफोर्ड मिरांडा, जैमे, गॅव्हीलीअन, जावी लारा, जेवेल राजा, ऑफ्टेंसे नाटो, समीह डाऊटी, व्हॅलमिरो लोपेस रोचा; आघाडीपटू : बलजित सहनी, हेल्डर पोस्टिगा, इयान हुमे, नादाँग भुतिआ, सुशील कुमार सिंग

ऐश्वर्या, आलियाचे नृत्य, ए.आर. रेहमानचे संगीत

आयएसएलच्या उद्घाटन सोहळय़ात ऐश्वर्या राय बच्चन आणि आलिया भट या बॉलीवूड अभिनेत्री नृत्य करणार असून प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान आपल्या संगीताची जादू दाखवणार असल्याचे सूत्रांकडून कळले. तसेच ही लढत पाहण्यासाठी बॉलीवूड शहेनशाह अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांतही सामन्याला उपस्थित राहणार आहेत.

 

आजचा सामना

अ‍ॅटलेटिको डी कोलकाता विरुद्ध चेन्नईयन एफसी

स्थळ : जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई

वेळ : सायंकाळी ७ वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 2:00 am

Web Title: indian super league chennaiyin fc eyeing home advantage against atletico de kolkata in opener
टॅग : Indian Super League
Next Stories
1 जगाच्या पाठीवर भारतीय पिछाडीवरच
2 सानिया-हिंगिस अंतिम फेरीत
3 भारताचे ‘विशेष’ खेळाडू रात्रभर रस्त्यावरच ; आशिया-पॅसिफिक क्रीडा स्पर्धेसाठी व्हिसा मिळवण्यासाठी करावी लागली प्रतिक्षा
Just Now!
X