इंडियन सुपर लीग फुटबॉल

यंदाच्या मोसमात एकमेव हॅट्ट्रिक झळकावणाऱ्या बिपीन सिंगने अखेरच्या क्षणी केलेल्या निर्णायक गोलमुळे मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या जेतेपदाचे स्वप्न साकारले. मुंबई सिटीने एटीके मोहन बागानला २-१ असे हरवत पहिल्यावहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवली.

फतोर्डा स्टेडियमवर शनिवारी रंगलेल्या अंतिम लढतीत डेव्हिड विल्यम्सने १८व्या मिनिटालाच मोहन बागानचे खाते खोलत आश्वासक सुरुवात केली. पण २९व्या मिनिटाला टिरी याच्या स्वयंगोलमुळे मुंबई सिटीला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. टिरीने हेडरद्वारे चेंडूला मैदानाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण गोलरक्षक पुढे आल्याने चेंडू सरळ गोलजाळ्यात गेला.

९०व्या मिनिटाला चेंडू अडवण्याच्या नादात मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य पुढे आला. पण गोलजाळ्याच्या जवळ असलेल्या बार्थोलोमेऊ ओगबेचे याने चेंडूवर नियंत्रण राखत तो बिपीनकडे सोपवला. त्यानंतर बिपीनने कोणतीही चूक न करता शानदार गोल करत मुंबई सिटीच्या विजयावर नाव कोरले.

पुरस्कारांचे मानकरी

* ‘गोल्डन बूट’ : इगोर अँग्युलो (एफसी गोवा, १४ गोल)

* ‘गोल्डन ग्लोव्हज’ : अरिंदम भट्टाचार्य (एटीके मोहन बागान)

* ‘गोल्डन बॉल’ : रॉय कृष्णा (एटीके मोहन बागान)

* ‘उभरता खेळाडू’ : लालेंगमाविया (नॉर्थईस्ट युनायटेड)

* आयएसएल’चे विजेते

वर्ष विजेता

२०१४   अ‍ॅटलेटिको डे कोलकाता

२०१५   चेन्नईयन एफसी

२०१६   अ‍ॅटलेटिको डे कोलकाता

२०१७-१८ चेन्नईयन एफसी

२०१८-१९ बेंगळूरु एफसी

२०१९-२० अ‍ॅटलेटिको डे कोलकाता

२०२०-२१ मुंबई सिटी एफसी