प्रेक्षकांच्या उपस्थितीविना तसेच सुरक्षा उपाययोजनांचे सर्व निकष पार करत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. टाळेबंदीच्या आठ महिन्यांच्या कालावधीनंतर देशात पहिल्यांदाच महत्त्वाच्या स्पर्धेस सुरुवात होत आहे.

माजी विजेता एटीके  मोहन बागान आणि केरळ ब्लास्टर्स यांच्यातील लढतीने जीएमसी स्टेडियमवर ‘आयएसएल’च्या सातव्या अध्यायाला प्रारंभ होणार आहे. मात्र एटीके  मोहन बागान आणि एससी ईस्ट बंगाल यांच्यात २७ नोव्हेंबर रोजी फतोर्डा स्टेडियमवर होणाऱ्या लढतीने देशातील जुने कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांशी दोन हात करताना दिसतील. गेल्या मोसमातील ‘आयएसएल’मधील तसेच आय-लीग फु टबॉलमधील अव्वल संघांचे एकत्रीकरण करण्यात आल्यानंतर एटीके मोहन बागान संघ (पूर्वीचा अ‍ॅटलेटिको डी कोलकाता) पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत आहे. यंदाच्या जेतेपदासाठी त्यांनाच प्रबळ दावेदार समजले जात आहे. ११ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ‘अ’ आणि ‘ब’ गटात प्रत्येकी चार तर ‘क’ गटात तीन संघ असतील.

* सामन्याची वेळ : सायं ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १

सुरक्षेचे कडक नियम

जैव-सुरक्षित वातावरणात खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला आपल्या आरोग्याबाबतची दैनंदिन माहिती एका अ‍ॅपद्वारे नमूद करावी लागणार आहे. गोव्यात दाखल झाल्यानंतर प्रत्येक संघ जैव-सुरक्षित वातावरणात असेल. संयोजकांनी वैद्यकीय पथकाची नेमणूक केली असून स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या आरोग्याचा ते आढावा घेतील.

‘आयएसएल’चे यश इतरांसाठी प्रेरणादायी -गांगुली

कोलकाता : करोनाचा धोका कायम असतानाही इंडियन सुपर लीग फुटबॉलला प्रारंभ होत असून या स्पर्धेचे यश हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याने व्यक्त केला. एटीके मोहन बागान फुटबॉल क्लबचा सहमालक असलेला गांगुली म्हणाला की, ‘‘आयएसएलला मिळालेल्या यशानंतर देशामध्ये मोठय़ा स्वरूपाच्या स्पर्धा आयोजित करावयाच्या की नाही, याचे बळ इतरांना मिळेल. टाळेबंदीनंतर देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. ही एका चांगल्या अध्यायाची सुरुवात आहे. देशवासीयांचे जीवन पूर्वपदावर येत असल्याचे आणि संकटाची भीती दूर पळाल्याचे हे द्योतक आहे.’’