घरच्या मैदानावर दिल्ली डायनामोजचे आव्हान
इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पध्रेच्या दुसऱ्या हंगामात तीन सामन्यांत कोऱ्या पाटीवर समाधान मानावे लागलेल्या मुंबई सिटी एफसी क्लबला बुधवारी तगडय़ा दिल्ली डायनामोजचे आव्हान पेलावे लागणार आहे. ही लढत घरच्या मैदानावर होत असल्यामुळे संपूर्ण तीन गुणांची कमाई करण्याचे मुंबईसमोर लक्ष्य आहे. या लढतीच्या निमित्ताने निकोलस अनेल्का आणि रॉबटरे कार्लोस या एकेकाळच्या संघसहकाऱ्यांना एकमेकांविरुद्ध रणनीती आखताना पाहण्याची संधी फुटबॉल चाहत्यांना मिळणार आहे. अनेल्का आणि कार्लोस हे १९९९-२००० या सत्रात रिअल माद्रिद क्लबकडून खेळले होते आणि त्या हंगामात त्यांनी चॅम्पियन्स लीगचा चषकही उंचावला होता.
आयएसएलच्या दुसऱ्या सत्रात मुंबईला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तीन सामन्यांतील कामगिरीनंतर त्यांना गुणतालिकेत एका गुणासह सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे दिल्लीने चार सामन्यांत तीन विजय मिळवीत ९ गुणांसह दुसरे स्थान काबीज केले आहे. नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवरील पहिल्या लढतीत मुंबईला चेन्नईयन एफसीकडून पराभव पत्करावा लागला होता आणि त्यामुळेच घरच्या प्रेक्षकांसमोर पुन्हा नामुष्की टाळण्याचे शिवधनुष्य मुंबईला पेलावे लागणार आहे.
सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २