पाच महिने सरावापासून वंचित जलतरणपटू वीरधवल खाडेचा निर्णय

सुप्रिया दाबके, लोकसत्ता

मुंबई : भारतामध्ये करोना साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका जलतरण खेळाला बसला आहे. काही क्रीडा प्रकारांना सरावाची परवानगी देशात मिळाली, मात्र जलतरणाच्या सरावाला अद्यापही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा विचार मी सोडून दिला आहे, अशी निराशाजनक प्रतिक्रिया महाराष्ट्राचा आघाडीचा जलतरणपटू वीरधवल खाडेने व्यक्त के ली आहे.

‘‘करोनाच्या साथीमुळे मार्चपासून देशातील जलतरण केंद्रे बंद आहेत. मात्र याचा फटका टोक्यो ऑलिम्पिकसाठी सज्ज होणाऱ्या जलतरणपटूंना बसला. माझ्यासारख्या खेळाडूंचा ऑलिम्पिकसाठी गरजेचा सराव पूर्णपणे ठप्प झाला. याबाबत भारतीय जलतरण महासंघाकडून (एसएफआय) सातत्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे ऑलिम्पिकच्या खेळाडूंना सरावाची परवानगी देण्याची मागणी होत होती. मात्र लगेचच त्या मागणीची दखल घेतली गेली नाही,’’ याकडे वीरधवलने लक्ष वेधले.

जलतरण संघटनेकडून नुकतीच ऑलिम्पिकसाठी सज्ज होणाऱ्या खेळाडूंना दुबईमध्ये दोन महिने सरावाची परवानगी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) मिळाली. मात्र दुबईला न जाण्याचा निर्णय राज्यात तहसीलदार पदावर कार्यरत असणाऱ्या वीरधवलने घेतला. ‘‘ऑलिम्पिकच्या तयारीसाठी पुरेसा वेळ गरजेचा होता. मात्र पाच महिने वाया गेल्याने दुबईला जाऊन तयारी करण्यास खूप उशीर झाला होता. त्यामुळे मी निराश झालो होतो,’’ असे २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या वीरधवलने सांगितले.

‘‘परदेशात म्हणजेच अमेरिकेत, युरोपमध्ये जलतरणाला परवानगी मिळालेली आहे. अमेरिकेत ऑक्टोबरमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या देशात जलतरणाला तुलनेने अन्य खेळांसारखे प्राधान्य देण्यात येत नाही. जलतरणामुळे करोना संसर्ग होण्याचा चुकीचा समज आहे. किमान स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जलतरणपटूंना तरी परवानगी मिळायला हवी,’’ असे वीरधवलने म्हटले.

आता पुढील कारकीर्द प्रशिक्षकाची!

लवकरच प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार असल्याचे विविध राष्ट्रीय विक्रम नावावर असणाऱ्या वीरधवलने सांगितले. ‘‘जेव्हा भारतात सरावाला परवानगी मिळेल तेव्हा प्रशिक्षक म्हणून यापुढे कारकीर्द घडवायची आहे. सध्या प्रशिक्षकांसाठीचे ऑनलाइन अभ्यासक्र म करीत आहे. त्याचा फायदा भारतात प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी होईल. देशात चांगले जलतरणपटू घडवण्याचा माझा उद्देश आहे,’’ असे वीरधवलने सांगितले.