आठवडय़ाची मुलाखत :  मनिका बत्रा, खेलरत्न पुरस्कार विजेती भारतीय टेबल टेनिसपटू

ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच-सहा महिन्यांपासून क्रीडा क्षेत्र ठप्प होते. परंतु ज्याप्रमाणे क्रिकेट, फुटबॉलच्या स्पर्धाना प्रारंभ झाला आहे. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवरील तसेच देशांतर्गत टेबल टेनिस स्पर्धाचेही लवकरच पुनरागमन होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने व्यक्त केली.

२५ वर्षीय मनिकाला गेल्या महिन्यात प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. जागतिक क्रमवारीत भारतीय महिलांपैकी सर्वाधिक वरच्या स्थानी असणारी मनिका कारकीर्दीत अधिक यशाची शिखरे गाठण्यासाठी आता सज्ज झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर टेबल टेनिसच्या भवितव्याविषयी आणि टाळेबंदीतील आव्हानांबाबत २०१८च्या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मनिकाशी केलेली ही खास बातचीत-

* खेलरत्न पुरस्कार पटकावणारी पहिली टेबल टेनिसपटू ठरल्याच्या अनुभवाविषयी काय सांगशील?

निश्चितच, माझ्या कारकीर्दीतील सर्वोच्च अभिमानाचा तो क्षण होता. राष्ट्रीय पुरस्काराद्वारे आपला सन्मान केला जावा, असे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहात असतो. त्यातही खेलरत्नसारख्या मौल्यवान पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आल्यामुळे आयुष्य सार्थकी लागले आहे, असे मला वाटते. टेबल टेनिसने मला जगभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी दिली. त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत मी या खेळाची ऋणी राहीन.

* टाळेबंदीच्या काळात तू स्वत:ची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती कशी राखली?

जवळपास गेली पाच-सहा महिने मी टेबल टेनिसपासून दूर आहे. टाळेबंदीच्या सुरुवातीचा काळ माझ्यासाठी फार आव्हानात्मक होता. परंतु बऱ्याच कालावधीनंतर कुटुंबीयांसह इतका वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्याशिवाय टाळेबंदीदरम्यानही मी शारीरिक किंवा मानसिक तंदुरुस्तीशी तडजोड केली नाही. घरच्या घरी व्यायाम आणि योगासन करण्यावर मी भर दिला. स्वत:चे आत्मपरीक्षण करून भविष्यातील लक्ष्य ठरवण्यासाठी मला या काळाचा उपयोग झाला. यादरम्यान माझे आहारतज्ज्ञ, फिजिओ, प्रशिक्षक आणि सहकारी यांच्याशी मी सातत्याने संवाद साधला.

* टेबल टेनिसच्या स्पर्धा आणि सराव शिबिरांना कधीपर्यंत सुरुवात होईल, असे तुला वाटते?

भारतातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या तरी टेबल टेनिसच्या पुनरागमनाविषयी मी ठामपणे मत व्यक्त करू शकत नाही. परंतु लवकरच टेबल टेनिसचे पुनरागमन होईल, अशी अपेक्षा आहे. कदाचित टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेल्या अथवा पात्रतेच्या शर्यतीत असलेल्या खेळाडूंसाठी भारतातच किंवा विदेशात सराव शिबिरांचे आयोजन करण्याचा पर्याय भारतीय टेबल टेनिस महासंघ स्वीकारू शकते. त्याशिवाय नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यादरम्यान चीन येथे टेबल टेनिसचा विश्वचषक रंगणार आहे, यापूर्वी किमान देशांतर्गत टेबल टेनिस स्पर्धाना प्रारंभ व्हावा, अशी माझी इच्छा आहे.

* भारतीय टेबल टेनिसपटूंच्या गेल्या काही वर्षांतील एकंदर कामगिरीविषयी तुझे काय मत आहे?

२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेपासून भारताच्या टेबल टेनिसमधील प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत चालला आहे. माझ्याव्यतिरिक्त शरथ कमल, जी. साथियन, मधुरिका पाटकर यांसारख्या अनुभवी खेळाडूंना याचे श्रेय जाते. क्रमवारीतसुद्धा भारतीय खेळाडूंनी वरचे स्थान मिळवण्याचा दिशेने प्रवास सुरू केला आहे. प्रशिक्षक, माजी खेळाडू यांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि सध्याच्या खेळाडूंची चिवट वृत्ती यासाठी कारणीभूत आहे.

* टेबल टेनिसच्या पायाभूत सुविधांमध्ये तुला कोणते बदल अपेक्षित आहेत?

गेल्या काही वर्षांत टेबल टेनिस खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. युवा पिढीतील अनेक मुलींनीही या खेळाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. खेलो इंडिया, अल्टिमेट टेबल टेनिस लीग यांसारख्या स्पर्धाचे यामध्ये मोठे योगदान आहे. त्यामुळे आगामी काळात भारताला आमच्यापेक्षाही प्रतिभावान टेबल टेनिसपटू लाभतील, अशी अपेक्षा आहे. फक्त शालेय स्तरावर प्रशिक्षकांनी खेळाडूंना तंत्रावर अधिक मेहनत घेण्यास भाग पाडले, तर त्यांच्यासाठी पुढे अधिक सोयीस्कर ठरेल, असे मला वाटते.