भारताचा सध्याचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने मावळते २०१९ हे वर्ष आपल्यासाठी यशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर मावळत्या वर्षांप्रमाणे नवीन वर्षही (२०२०) यश मिळवणारे ठरेल, अशी अपेक्षा बुमराने केली आहे.

‘‘२०१९ हे वर्ष आपल्यासाठी यशस्वी ठरले आहे. या वर्षांत यशासोबत आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तसेच मैदानावरील आणि मैदानाबाहेरील अनेक आठवणी स्मरणात राहतील. २०२० या वर्षांसाठी आपण आतुर आहोत,’’ असे बुमराने त्याच्या ‘ट्विटर’वर म्हटले आहे.

बुमराने मावळत्या वर्षांच्या चांगल्या आठवणींची छायाचित्रेदेखील ‘ट्विटर’वर टाकली आहेत. मावळत्या वर्षांत बुमरा फक्त भारताचाच तीनही  प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाज नव्हता तर त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बुमराला अव्वल क्रमवारी आहे. कसोटी क्रमवारीतही बुमरा सहाव्या स्थानी आहे. हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा बुमरा हा भारताचा तिसराच गोलंदाज ठरला आहे. बुमराने १२ कसोटींत ६२ बळी, ५८ एकदिवसीय सामन्यांत १०३ बळी, ४२ ट्वेन्टी-२० सामन्यांत ५१ बळी मिळवले आहेत.

ऑगस्टनंतर मात्र बुमरा पाठीच्या दुखापतीमुळे खेळापासून दूर आहे. मात्र येत्या रविवारपासून (५ जानेवारी) श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतून बुमरा पुनरागमन करणार आहे. श्रीलंकेच्या मालिकेनंतर १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठीही बुमराची भारतीय संघात निवड झाली आहे.