३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु झालेली विश्वचषक स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यामध्ये आली आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड या तीन संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. चौथ्या स्थानावर न्यूझीलंड बाजी मारेल हे आता निश्चीत झालं असलं तरीही त्यांना अधिकृत निकालासाठी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्याला चाहते हजारो संख्येने गर्दी करत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी चाहते मैदान, हॉटेल इथे गर्दी करत असतात. अशावेळी खेळाडूंच्या सुरक्षाही धोक्यात येण्याची शक्यता असते. याच कारणामुळे भारतीय संघ व्यवस्थान आयसीसीच्या सुरक्षा व्यवस्थेवर नाराज असल्याचं समजतंय.

विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच बीसीसीआयने भारतीय संघाच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी आयसीसीने संघाच्या सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कमी पडणार नाही याची खात्री दिली होती. मात्र इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर अनेक चाहते भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी हॉटेलवर येत असल्याची तक्रार भारतीय संघ व्यवस्थापनाने आयसीसीकडे केली होती. अशा प्रकारांमुळे खेळाडूंचं खासगी आयुष्य आणि त्यांच्या सुरक्षेला धोका असल्याचं भारतीय संघ व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. याबाबत आयसीसीसकेड तक्रार करुनही यावर काहीच पाऊल उचललं जात नसल्याचं, भारतीय संघ व्यवस्थापनामधल्या अधिकाऱ्याने सांगितलं.

आयसीसीने मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. “भारतीय संघासोबत प्रत्येक संघाच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना राबवल्या गेल्या असल्याचं आयसीसीने स्पष्ट केलंय. या उपाययोजना आम्ही प्रसारमाध्यमांना सांगत नाही, मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने तक्रार केल्यानंतर, हॉटेलच्या प्रवेशद्वारासाठी पर्यायी मार्ग खुला करण्यात आला होता. याचसोबत खेळाडू राहत असलेल्या भागात कमी वर्दळ राहील याची काळजी घेतली होती.” त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : पंचांशी हुज्जत घातल्यामुळे विराट कोहली अडचणीत, होऊ शकते बंदीची कारवाई