न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. टी-२० मालिकेत ५-० ने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाची वन-डे मालिकेतही कामगिरी एकदम खालावली. विशेषकरुन गोलंदाजांनी या मालिकेत निराशा केली. जसप्रीत बुमराहला या मालिकेत एकही बळी घेता आला नाही. तर फिरकीपटू कुलदीप यादव च्या गोलंदाजीवरही न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलीच फटकेबाजी केली. मात्र कुलदीपचा फॉर्म गमावण्यामागे एक वेगळचं कारण समोर येतं आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : खराब क्षेत्ररक्षण भारताच्या पराभवाचं कारण नाही !

Bangalore Mirror वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ व्यवस्थापन कुलदीप यादवला खांद्याची दुखापत झालेली असतानाही खेळवण्याचा प्रयत्न करत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही बाब बाहेर येऊ नये यासाठीही संघ व्यवस्थापनाकडून प्रयत्न झाले. न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर काही दिवसांनीच कुलदीपच्या खांद्याला दुखापत झाली होती. याच कारणामुळे त्याला टी-२० मालिकेत संधी नाकारण्यात आली. मात्र ही दुखापत बरी झालेली नसतानाही त्याला वन-डे मालिकेत खेळवण्यात आलं…ज्यामुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचं बोललं जातंय.

अवश्य वाचा – एकही विकेट न मिळालेल्या बुमराहला झहीरचा मोलाचा सल्ला, म्हणाला…

टी-२० मालिकेदरम्यान कुलदीप सरावसत्रातही फारसा सहभागी झाला नाही. तसेच टी-२० सामन्यादरम्यान समालोचकानेही कुलदीपच्या दुखापतीची माहिती दिली होती. कुलदीपला त्या दुखापतीमधून सावरायला किमान एक आठवडा लागेल अशी माहिती समालोचकाने दिली होती. मात्र या गोष्टीवर बीसीसीआय किंवा संघ व्यवस्थापनाने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणेला आता वन-डे संघात जागा मिळायला हवी !