प्रशांत केणी

२०११च्या विश्वविजेतेपदानंतर भारतीय क्रिकेट संघाची वाटचाल सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीपर्यंत मर्यादित राहिली. सकारात्मक पद्धतीने विचार करायचा तर सलग तीन विश्वचषक स्पर्धामध्ये भारताने उपांत्य फेरी गाठली. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवले. यापैकी विजेतेपद आशियाई खंडात भारतात मिळवलेले. परंतु मागील दोन विश्वचषकांमध्ये आपण उपांत्य फेरीत मारलेली मजल ही आशियाई खंडाबाहेर वेगवान गोलंदाजांचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील आहे, याचेही गांभीर्य समजून घ्यायला हवे. २०१७ मध्ये भारताने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उपविजेतेपद प्राप्त केले, तेसुद्धा इंग्लंडमधील खेळपट्टय़ा आणि वातावरणातील आहे.

परंतु नकारात्मक पद्धतीने या कामगिरीचे विश्लेषण केल्यास ‘कचखाऊ’ हा शिक्का मारून काही जाणकार मोकळे झाले आहेत. ‘जगातील सर्वोत्तम गोलंदाजी’ हे बिरुद विश्वचषकातील अखेरच्या सामन्यापर्यंत टिकून राहिले. पण सामना जिंकून देऊ शकणारी फलंदाजी ही रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळेच भारताला बाद फेरीत न्यूझीलंडसारख्या कडव्या संघाला हरवण्यात अपयश आले.

भारताच्या पराभवानंतर आता महेंद्रसिंह धोनी निवृत्ती पत्करणार का? हा राष्ट्रीय स्तरावरील सर्वात एक ज्वलंत विषय ठरत आहे. दोन विश्वविजेतेपद जिंकून देणारा हा महान संघनायक या विश्वचषकात भारतासाठी तारणहार ठरू शकला नाही. विजयवीर म्हणजेच ‘फिनिशर’चा त्याचा मिडासस्पर्श आता खात्रीदायक पद्धतीने भारताला जिंकून देऊ शकत नाही. तो अन्य फलंदाजांप्रमाणे धावचीतसुद्धा होऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे. याचप्रमाणे यष्टीपाठी उभे राहून तिसऱ्या पंचांकडे दाद मागता येणारी ‘धोनी आढावा पद्धती’(धोनी रिव्ह्य़ू सिस्टीम) अयशस्वीच बऱ्याचदा झालेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धोनीने आक्रमकतेचे हत्यार म्यान करून संयमी फलंदाजीची भूमिका खेळणेच पसंत केले. इंग्लंडमधील खेळपट्टय़ा आणि वातावरणात मैदानावर थांबून मग स्थिरावल्यावर खराब चेंडूंवर फटकेबाजी करण्याचे धोरण आवश्यक असते. पण त्या वेळीही त्याने आक्रमक धोनीऐवजी संयमी धोनीला प्राधान्य दिले. अखेरच्या सामन्यातील त्याच्या संयमाची अग्निपरीक्षा अशक्यप्राय दुसरी धाव काढताना घेतली गेली आणि त्यात तो अपयशी ठरला. त्याने दक्षिण आफ्रिका ३४, ऑस्ट्रेलिया २७, पाकिस्तान १, अफगाणिस्तान २८, वेस्ट इंडिज ५६*, इंग्लंड ४२*, बांगलादेश ३५, श्रीलंका आणि न्यूझीलंड ५० अशा आठ डावांत २७३ धावा केल्या. त्याची ४५.५० ही सरासरी जरी लक्षवेधी असली तरी आता भारतीय क्रिकेटने त्याच्या सेवेचा आदर करून भवितव्याचा विचार करायला हवा.

भारताने विश्वचषकात जिंकलेल्या १० पैकी सात सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या फलंदाजीचा सिंहाचा वाटा होता. भारताची आघाडीची फळी समर्थ होती. शिखर धवन आणि विराट कोहलीने आपल्या भूमिका चोख बजावल्या. पण धवनने दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर त्याची जागा घेऊ शकेल असा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज आपल्याला सापडला नाही. परिणामी आपण चौथ्या फळीत स्थिरस्थावर झालेल्या लोकेश राहुलला सलामीला पाचारण केले. राहुलने काही उपयुक्त भागीदाऱ्या जरी केल्या असल्या तरी धवनप्रमाणे प्रतिस्पर्धी गोलंदाजांची लय बिघडवणे त्याला जमले नाही. मग चौथ्या क्रमांकासाठी आपण वारंवार फलंदाज बदलले. शंकरऐवजी निवड केलेल्या मयांक अगरवाल या नवख्या खेळाडूला विश्वचषकात आजमावणे जोखमीचे होते. परंतु ऋषभ पंतला सलामीला पाठवता आले असते. पंत आणि हार्दिक पंडय़ा यांनी ट्वेन्टी-२० क्रिकेटला साजेशा छोटेखानी वेगवान खेळ्यांमध्येच धन्यता मानली. त्यांच्याकडून मोठय़ा खेळींच्या अपेक्षा करताच आल्या नाहीत. दिनेश कार्तिकच्या खात्यावर एकूण १४ धावा जेमतेम जमा झाल्या आहेत. केदार जाधवमध्येही विश्वचषकाचा आत्मविश्वास दिसला नाही. त्यामुळे मधली फळी फक्त न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सक्षमपणे उभी राहिली. रवींद्र जडेजाने आपले अष्टपैलूत्व दाखवून दिले. ज्याची उपयुक्तता आपल्याला नंतर पटली.

भारतीय संघ राऊंड रॉबिन लीगचे दिव्य पार करू शकला आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंडला २३९ धावसंख्येवर रोखू शकला, याचे श्रेय गोलंदाजांना द्यायला हवे. जसप्रीत बुमरा (१८ बळी), मोहम्मद शमी (१४ बळी), भुवनेश्वर कुमार (१० बळी) आणि हार्दिक पंडय़ा (१० बळी) यांनी टिच्चून वेगवान मारा केला. याचप्रमाणे यजुर्वेद्र चहल (१२ बळी) आणि कुलदीप यादव (६ बळी) यांनी खेळपट्टीनुसार अचूक फिरकीचा मारा केला.