भारताने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका गमावली असली तरी मागच्या १५-२० वर्षातील अन्य भारतीय संघांच्या तुलनेत सध्याचा संघाने परदेशात चांगली कामगिरी केली आहे असे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. चौथ्या कसोटी इंग्लंडने भारताचा ६० धावांनी पराभव करुन कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.

आमच्या संघाने जितके प्रयत्न केले त्यापेक्षा इंग्लंडचा संघ एक पाऊल पुढे होता. चांगली, आव्हानात्मक लढत देऊन जिंकण्याचा आमच्या संघाचा प्रयत्न होता. मागच्या तीन वर्षातील तुम्ही भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल कि, परदेशात भारतीय संघ नऊ कसोटी सामने जिंकला आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंके विरुद्ध मिळून तीन कसोटी मालिका जिंकल्या आहेत असे शास्त्री म्हणाले.

मागच्या १५-२० वर्षात अन्य कुठल्या भारतीय संघाने इतक्यात कमी कालावधीत अशी कामगिरी करुन दाखवल्याचे मी पाहिलेले नाही. त्यावेळच्या संघात प्रतिभावंत खेळाडू असून सुद्धा अशी कामगिरी करणे शक्य झाले नव्हते असे शास्त्री म्हणाले. सामना हरल्यानंतर दु:ख होते. पण त्याचवेळी तु्म्ही आत्मविश्लेषण करता. त्याचवेळी तु्म्हाला त्या परिस्थितीशा कसा सामना करायचा त्याचा मार्ग सापडतो.

स्वत:वर विश्वास ठेवला तर यश नक्की मिळेल असे शास्त्री म्हणाले. परदेशात कसोटी मालिका जिंकण्यासाठी मानसिक दृष्टया कणखर होणे आवश्यक आहे असे शास्त्री म्हणाले. तुम्ही मानसिक दृष्टया कणखर झाले पाहिजे असे मला वाटते. परदेशात आम्ही विजयाच्या जवळ पोहोचलो. चांगली लढत दिली पण आता तुल्यबळ लढत देऊन भागणार नाही आपल्याला इथून पुढे सामने जिंकावे लागतील. कुठे चुकलो त्याचा अभ्यास करुन पुढे ती चूक सुधारली पाहिजे असे शास्त्री म्हणाले.