ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या खडतर मालिकेसाठी भारतीय संघाचे तीनदिवसीय सराव शिबीर बंगळुरूत शनिवारपासून सुरू झाले. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर कसोटीच्या निमित्ताने पुन्हा मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण मालिकेपूर्वी सचिनने फलंदाजीचा कसून सराव केला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावांसाठी झगडणाऱ्या सचिनने विराट कोहलीच्या साथीने चिन्नास्वामी स्टेडियमच्या मुख्य खेळपट्टीवर अशोक दिंडा, भुवनेश्वर कुमार, प्रग्यान ओझा आणि रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर जोरदार सराव केला.
दोन महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय संघात समाविष्ट होणाऱ्या तेंडुलकरने कोणत्याही विशिष्ट असा फटक्याचा सराव केला नाही मात्र मूलभूत गोष्टी घोटीव करण्यावर त्याने भर दिला. नुकत्याच झालेल्या रणजी करंडक स्पर्धेत दोन शतके झळकावणाऱ्या सचिनने कोणत्याही गोलंदाजाला विशिष्ट टप्प्यावर गोलंदाजी करण्यास सांगितले नाही.  
प्रदीर्घ काळ शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी उपयुक्त अशा ‘हाय अल्टिटय़ूड मास्क’ परिधान करत शिखर धवन आणि मुरली विजय यांनी फलंदाजीवर प्रचंड मेहनत घेतली.
या दोघांसह वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांनी मुख्य खेळपट्टीवर सराव केला. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक जो डावेस यांच्याकडून टेनिस बॉलवर थ्रोडाऊनचा सरावही त्यांनी केला. ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघाविरुद्ध आखूड टप्प्याच्या चेंडूचा भडिमार करण्याची शक्यता आहे. त्या पाश्र्वभूमीवर भारतीय फलंदाजांनी उसळत्या चेंडू्च्या सरावाला प्राधान्य दिले.
भारताचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी युवा, उदयोन्मुख १५ गोलंदाजांची निवड केली असून, हे गोलंदाज भारताच्या मुख्य फलंदाजांसमोर गोलंदाजी करणार आहेत. यामध्ये नऊ वेगवान गोलंदाज तर सहा फिरकी गोलंदाज आहेत.
देशभरातील विविध शहरांमध्ये आयोजित निवड चाचण्यांमधून या गोलंदाजांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना मुंबई, चेन्नई आणि मोहाली येथील विभागीय अकादमींमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे माजी प्रमुख आणि सध्याचे निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प आहे. या गोलंदाजांमुळे भारताच्या मुख्य गोलंदाजीवरील जबाबदारीही कमी होणार आहे.