ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणी बॉक्सिंग

देशातील क्रीडाक्षेत्राचे लक्ष वेधलेल्या बॉक्सिंग लढतीत शनिवारी सहा वेळा विजेत्या एमसी मेरी कोमने (५१ किलो) निखत झरीनला नामोहरम केले आणि पुढील वर्षी चीनला होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान पक्के केले. परंतु मेरीने या लढतीत अखिलावृत्तीचे दर्शन घडवले.

३६ वर्षीय मेरी कोमने २३ वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या झरीनचा ९-१ असा पराभव केला. मेरी कोमसाठीसुद्धा निवड चाचणीचा निकष असायला हवा, अशी मागणी करीत या लढतीविषयीची उत्कंठा झरीनने वाढवल्याने बॉक्सिंग हॉलमधील वातावरण तणावपूर्ण शांततेचे होते. लढतीच्या उत्तरार्धात मेरी कोमचा संयम सुटला, जो तिने सुरुवातीपासून जपला होता. अखेरच्या तीन मिनिटांत तिने खेळ उंचावला.

बहुचर्चित लढतीदरम्यान रिंगणात आणि रिंगणाबाहेरही उभय बॉक्सिंगपटूंमध्ये वाक् युद्ध रंगात आले होते. लढतीचा निकाल लागल्यानंतर झरीनला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या तेलंगण बॉक्सिंग संघटनेच्या पाठीराख्यांनी निकालाबाबत नाराजी प्रकट केली. लढतीनंतर मेरीने झरीनचे हस्तांदोलन टाळले आणि आलिंगनसुद्धा झिडकारले. यासंदर्भात विचारले असता मेरी म्हणाली की, ‘‘आमच्या खेळात याला जखडणे असे म्हणतात!’’

लढत संपल्यानंतर तेलंगण बॉक्सिंग संघटनेच्या ए. पी. रेड्डी यांनी निकालाबाबत घोषणा देत निषेध व्यक्त केला. परंतु भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग यांनी रिंगणाबाहेरील परिस्थिती नियंत्रणात आणली.

अन्य लढतींत, ५७ किलो वजनी गटात आशियाई पदकविजेत्या साक्षी चौधरीने दोन वेळा रौप्यपदक विजेत्या सोनिया लाथेरला नमवले. ६० किलो गटात राष्ट्रीय विजेत्या सिम्रनजीत कौरने माजी विश्वविजेत्या एल. सरिता देवीचा पराभव केला. दोन वेळा जागतिक पदकविजेत्या लव्हलिना बोर्गोहेनने ६९ किलो गटात ललिताला सहज पराभूत केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेत्या पूजा राणीने ७५ किलो गटात नूपुरला नामोहरम केले.

महिलांच्या अंतिम सामन्यांचे निकाल

५१ किलो गट

एमसी मेरी कोम विजयी वि. निखत झरीन ९-१

५७ किलो गट

साक्षी चौधरी विजयी वि. सोनिया लाथेर ९-१

६० किलो गट

सिम्रनजीत कौर विजयी वि. एल. सरिता देवी

८-२

७५ किलो गट

पूजा राणी विजयी वि. नूपुर १०-०

भारतीय संघ

एमसी मेरी कोम, साक्षी चौधरी, सिम्रनजीत कौर, लव्हलिना बोर्गोहेन, पूजा राणी.

मीसुद्धा माणूस आहे आणि मलाही राग येतो. तुमच्या खेळभावनेवरच कुणी प्रश्न उपस्थित केला, तर राग येणारच. हे काही प्रथमच घडलेले नाही. माझ्याइतके यश कोणत्याही बॉक्सिंगपटूने मिळवले नसले, तरी माझ्या बाबतीत हे अनेकदा घडले आहे. परंतु आता निवड चाचणी संपली आहे आणि मला पुढे जायला हवे. कामगिरी करावी आणि माझे स्थान मिळवावे. तुला कोणी थांबवले आहे? आधी कामगिरी करावी आणि मग बोलावे, आधी नव्हे. प्रत्येकाने झरीनने कशी कामगिरी केली ते पाहिले. मी या वादाला प्रारंभ केला नव्हता. निवड चाचणीत मी सहभागी होणार नाही, असे मी कधीच म्हटले नव्हते. त्यामुळे माझे नाव अनावश्यक वादात गोवले जाऊ नये अशी माझी अपेक्षा होती. कारण माझी कोणतीच चूक नव्हती.

– एमसी मेरी कोम

मेरी कोमच्या वागण्याने मी दुखावले आहे. रिंगणातसुद्धा तिने चांगली भाषा वापरली नाही. परंतु ते ठीक आहे. मी कनिष्ठ खेळाडू आहे. त्यामुळे मेरीसारख्या वरिष्ठ खेळाडूने सामना संपल्यानंतर आलिंगन देणे योग्य ठरले असते. परंतु याबाबत मला आणखी काहीच प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही.

– निखत झरीन

मेरी कोमविषयी कितीही बोलले तरी ते कमीच असेल. तिच्याकडे बॉक्सिंगमधील असामान्य प्रतिभा आहे, तर झरीनकडून भविष्यात मोठय़ा आशा आहेत. तिनेही या लढतीत लक्षवेधी खेळाचे प्रदर्शन केले.

– अजय सिंग, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष

राजकारणाचे एवढे वर्चस्व असेल, तर बॉक्सिंग खेळाचा विकास कसा होईल?

– ए. पी. रेड्डी, तेलंगण बॉक्सिंग संघटनेचे सदस्य