News Flash

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज

गुरुवारी इंडोनेशियाला रवाना झाला असून अनेक शरीरसौष्ठवपटूंकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत

बॉबी सिंग

मुंबई : इंडोनेशियातील बटाम येथे २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱ्या ५३व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ६५ जणांचा भारतीय संघ गुरुवारी इंडोनेशियाला रवाना झाला असून अनेक शरीरसौष्ठवपटूंकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.

सहा वेळा जागतिक विजेता बॉबी सिंग तसेच सबरे सिंग, जयप्रकाश, वैभव महाजन या भारतीय रेल्वेच्या खेळाडूंसह रामा मूर्ती (सेनादल), चैत्रेशन नतेशन (केरळ) आणि टी. कँडी रियाज (मणिपूर) या शरीरसौष्ठवपटूंकडून भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी आणि रोहन धुरी यांच्याकडूनही भरीव कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. महिलांच्या शरीरसौष्ठवमध्ये अमला ब्रह्मचारी (महाराष्ट्र), माधवी बिलोचन (उत्तराखंड) तर फिजिक स्पोर्ट्स प्रकारात महाराष्ट्राच्या निसरीन पारीख, मंजिरी भावसार आणि आदिती बंब या सहभागी होत आहेत.

‘‘गेल्या वर्षीपासून भारतीय खेळाडू तज्ज्ञ प्रशिक्षक आणि माजी शरीरसौष्ठवपटूंच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते. त्याचा नक्कीच फायदा भारतीय खेळाडूंना होणार आहे. गेल्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानणारा भारतीय संघ या वेळी विजेतेपद संपादन करील,’’ असा विश्वास भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्रेमचंद डेग्रा यांनी व्यक्त केला.

अपंग स्पर्धेचे पहिल्यांदाच आयोजन: आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच अपंगांसाठीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात भारताचा दिव्यांग संघही उतरणार आहे. त्यामुळे अपंग शरीरसौष्ठवपटूंना एक चांगले व्यासपीठ याद्वारे मिळणार आहे. शामसिंग शेरा (पंजाब), अश्विन कुमार (छत्तीसगड), लोकेश कुमार (दिल्ली) आणि के. सुरेश (तमिळनाडू) हे अपंग खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 2:43 am

Web Title: indian team ready for asian bodybuilding zws 70
Next Stories
1 आशियाई वयोगट जलतरण स्पर्धा : भारताला नववे सुवर्णपदक
2 कोरिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : कश्यप उपांत्यपूर्व फेरीत
3 भारत-बेल्जियम  हॉकी मालिका : भारताचा बेल्जियमवर शानदार विजय
Just Now!
X