वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड; अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची धुरा; झिम्बाब्वे दौऱ्यासाठी युवा संघाचे नेतृत्व धोनीकडे; विदर्भच्या फैझ फझलचा समावेश

क्रीडा प्रतिनिधी, मुंबईमुंबईचा जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूरला आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी संघात संधी देण्यात आली आहे, तर झिम्बाब्वे दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीच्या दुसऱ्या फळीच्या संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी करणार आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या दोन्ही दौऱ्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विंडीज संघाचा सामना करणाऱ्या भारताच्या उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणेची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवनिर्वाचित सचिव अजय शिर्के यांनी ही घोषणा केली.

स्थानिक स्पर्धामधील सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत निवड समितीने शार्दूलला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या १७ सदस्यीय संघात समाविष्ट केले आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज शार्दूलने ११ सामन्यांत २४.५१च्या सरासरीने ४१ बळी टिपले आहेत. त्याने एका डावात १०७ धावांत ६ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघात सहभागी असलेल्या वरुण आरोनला वगळण्यात आले असून त्या जागी मोहम्मद शमीला संघी देण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीने संघातील स्थान कायम राखले आहे.

गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांना आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही निवड समितीने संघात स्थान दिलेले नाही. विंडीज दौऱ्यावर भारतीय संघ चार कसोटी सामने खेळणार असून जुलैमध्ये ही मालिका अपेक्षित आहे. ‘‘कोणालाही विश्रांती देण्यात आलेली नाही. विश्रांती देण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्रही बीसीसीआयकडे कुणी पाठवलेले नाही. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय निवड समितीचा आहे,’’ असे निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले.

कोहलीला विश्रांती

झिम्बाब्वे विरुद्ध ११ ते २० जून या कालावधीत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे, तर मुरली विजय आणि आशीष नेहरा यांना दुखापतीमुळे संघात स्थान देण्याचे निवड समितीने टाळले. या दौऱ्यासाठी निवड समितीने संपूर्ण नव्या खेळाडूंची मोट बांधली आहे. विदर्भचा सलामीवीर फैझ फझल, जयंत यादव, पंजाबचा मनदीप सिंग आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या  युझवेंद्र चहलला संघात स्थान मिळाले आहे.

कोहलीवरून खडाजंगी

हाताला दुखापत झालेली असतानाही विराट कोहली आयपीएल खेळत आहे, परंतु त्याला झिम्बाब्वे दौऱ्यात विश्रांती देण्यात आली आहे. ‘भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहर्ट यांच्याकडून मिळालेल्या अहवालानुसार आयपीएलनंतर कोहलीला विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यामुळे अहवालानुसार आम्ही हा निर्णय घेतला आहे,’ असे पाटील यांनी सांगितले. या मुद्दय़ावर शिर्के म्हणाले की,‘या चर्चेकडे वाद म्हणून पाहू नका. सध्याच्या घडीला विराट हा चांगल्या फॉर्मात आहे आणि त्यामुळे त्याला या दौऱ्यावर खेळविण्याची मी विनंती केली होती. दौऱ्याच्या मध्यातही वैद्यकीय सल्ला घेता येतो. त्यामुळे तो आयपीएल खेळतो आणि देशासाठी नाही, हा मुद्दाच आला नसता.’

भारतीय संघ

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मुरली विजय, शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृद्धिमान सहा, आर. अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, स्टुअर्ट बिन्नी, उमेश यादव.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), के. एल. राहुल, फैझ फझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायडू, रिशी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मनदीप सिंग, जयदेव उनाडकत, केदार जाधव, युझवेंद्र चहल.

इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) सामने आम्ही टेलिव्हिजनवर पाहणे पसंत करतो. स्टेडियममध्ये बसून सामने पाहताना रिप्लेची सुविधा नसते. युवा खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी टीव्हीचे माध्यम उपयुक्त ठरते.

– संदीप पाटील,  निवड समिती अध्यक्ष

काही वर्षांपूर्वी रणजी हंगामात मी ७०० धावा केल्या होत्या. त्या वेळी भारतीय संघात निवड होईल अशी आशा होती. मात्र ती फोल ठरली. त्यानंतर संघनिवड होईल ही अपेक्षाच मी सोडून दिली. मात्र आज संघात निवड झाल्याचे कळले आणि आयुष्याचा अर्थच बदलला. खूप आनंद आणि समाधान देणारी घटना आहे. प्रत्येक क्रिकेटपटूची भारतासाठी खेळण्याची इच्छा असते. शंभरहून अधिक प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव असलेल्या खेळाडूंनाही संधी मिळत नाही. मला ही संधी उशिराने का होईना मिळाली आहे. ७९ प्रथम श्रेणी सामन्यांनंतर पुरेसा परिपक्व झाला आहे.

– फैझ फझल,  भारतीय संघात निवड झालेला खेळाडू

मुंबई क्रिकेटची संस्कृती अंगी भिनवल्यास, खेळाडूचे भवितव्य उज्वल होऊ शकते. मुंबई रणजी संघासाठीच्या प्रदर्शनामुळेच मला राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडले आहेत. मुंबईसाठी खेळताना उत्तम असून चालत नाही तर तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागतो. मुंबईसाठी खेळायला लागल्यापासून हा विचार माझ्या अंगी बाणवला आहे. वैयक्तिक प्रशिक्षक दिनेश लाड, मुंबईच्या २५ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक विलास गोडबोले, मुंबई वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक प्रवीण अमरे आणि चंद्रकांत पंडित यांनी सातत्याने  मुंबई क्रिकेटने निर्माण केलेल्या मापदंडासंदर्भात सातत्याने कल्पना दिली. सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळेच राष्ट्रीय संघात स्थान मिळाले.

– शार्दूल ठाकूर