भारत-विंडीज क्रिकेट मालिका

वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना आज

कमकुवत वेस्ट इंडिज संघावर कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवल्यानंतर रविवारपासून एकदिवसीय मालिकेच्या रणधुमाळीला गुवाहाटीमधील पहिल्या सामन्याने प्रारंभ होत आहे. २०१९च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताला मधल्या फळीची चिंता भेडसावत आहे.

विश्वचषक स्पर्धेला आता फक्त आठ महिन्यांचा अवधी बाकी आहे. म्हणजेच पुढील १८ सामन्यांमध्ये भारताला मधली फळी निश्चित करायची आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी विश्रांती घेणारा भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली संघात परतला आहे.

चौथ्या स्थानासाठी रायुडूचा पर्याय

चौथ्या स्थानावर अनेक फलंदाज अजमावण्यात आले, मात्र त्याला योग्य न्याय देऊ शकेल, असा फलंदाज अद्याप मिळालेला नाही. मात्र अंबाती रायुडूने हे स्थान पक्के केल्यास मधल्या फळीची चिंता मिटेल, असा दावा कोहलीने केला आहे. रायुडूने आशिया चषक स्पर्धेतील सहा डावांमध्ये ४३.७५च्या सरासरीने १७५ धावा केल्या होत्या. त्या तुलनेत तीन वर्षांपूर्वी पदार्पण करणाऱ्या मनीष पांडेला संघातील स्थान टिकवता आलेले नाही. हार्दिक पंडय़ाला दुखापत झाल्यामुळे अष्टपैलू रवींद्र जडेजावरील जबाबदारीसुद्धा वाढली आहे.

धोनी ‘लक्ष्य’स्थानी

विश्वचषकापर्यंत महेंद्रसिंह धोनी हा भारताचा प्रथम पसंतीचा यष्टीरक्षक असेल, असा दावा जरी राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केला असला तरी त्याच्या कामगिरीवर त्यांचे बारकाईने लक्ष असेल. मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या धोनीने आशिया चषक स्पर्धेतील चार डावांमध्ये १९.२५च्या सरासरीने एकूण ७७ धावा केल्या. चालू वर्षांतील १५ सामन्यांमध्ये १० डावांत त्याला फलंदाजी करता आली. यात त्याची सरासरी २८.१२ इतकी आहे. पुढील विश्वचषक इंग्लंडमध्ये आहे. या देशातील २० सामन्यांत धोनीची सरासरी ३८.०६ आहे आणि एकही शतक झळकावलेले नाही.

ऋषभला पदार्पणाची संधी

मधल्या फळीत कोहली नवा प्रयोग करण्याची शक्यता असून, कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरणाऱ्या ऋषभ पंतला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ओव्हल येथील इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणीय कसोटी सामन्यात शतकी खेळी साकारणारा २१ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज पंतने त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही फलंदाजीतील सातत्य दाखवून दिले.

वेगवान माऱ्याची धुरा शमी-यादववर

भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी आणि उमेश यादव वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील. आशिया चषक स्पर्धेतील दोन सामन्यांत संधी मिळालेला डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदसुद्धा अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहे. याचप्रमाणे भारताच्या फिरकीची मदार कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलवर असेल.

गेल, रसेल, लेविसची अनुपस्थिती भेडसावणार

कसोटीमधील ढिसाळ कामगिरी मागे टाकत वेस्ट इंडिजचा संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये अधिक चांगली कामगिरी करील, अशी अपेक्षा आहे. ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल यांच्याशिवाय भारतात आलेल्या या संघाला सलामीवीर एव्हिन लेविसची अनुपस्थितीसुद्धा तीव्रतेने भेडसावणार आहे. प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी आयसीसीच्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी त्यांना पहिल्या दोन सामन्यांसाठी ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सॅम्युअल्स, होल्डर, रोचवर मदार

विंडीजच्या संघात मार्लन सॅम्युअल्स, कर्णधार जेसर होल्डर, केमार रोच हे अनुभवी खेळाडू आहेत, तर सलामीवीर चंदरपॉल हेमराज, अष्टपैलू फॅबियान अ‍ॅलीन आणि वेगवान गोलंदाज ओशानी थॉमस हे नवखे खेळाडू आहेत. आयसीसी क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या विंडीजने याआधीची बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका १-२ अशा फरकाने गमावली आहे. या संघाने २०१४ नंतर एकसुद्धा मालिका जिंकलेली नाही.

संघ

भारत (१२ खेळाडू) : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, के. खलील अहमद, उमेश यादव.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), फॅबिन अ‍ॅलीन, सुनील अ‍ॅम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, अल्झारी जोसेफ, कायरेन पॉवेल, अ‍ॅश्ले नर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशाने थॉमस, ओबॅड मॅक्कॉय.