कनिष्ठ आशियाई बॅडमिंटन स्पर्धा

सुझोऊ (चीन) येथे चालू असलेल्या कनिष्ठ आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात येण्यापूर्वी मैसनाम मैराबाने झुंजार खेळाचे प्रदर्शन केले. मिश्र सांघिक प्रकाराच्या उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाने भारताला ३-० असे नामोहरम केले.

कनिष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल २० खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या मैराबा (१४ वे स्थान) आणि बॉबी सेटिआबुडी (१७ वे स्थान) यांच्यातील लढत ५९ मिनिटे रंगली. परंतु सेटिआबुडीने २१-१७, १५-२१-२१-११ असा विजय मिळवला.

मुलींच्या एकेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या पुत्री कुसुमा वार्दानीने भारताच्या मालविका बनसोडचा २२-२०, २१-७ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत लीओ रॉली कार्नाडो आणि इंडाह चाहया सारी जामिल जोडीने तनिशा क्रॅस्ट्रो आणि सतीश कुमार करुणाकरन जोडीचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला.

राऊंड रॉबिन साखळीत भारताने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत मोंगोलिया आणि मकाऊ चीनचा प्रत्येकी ५-० अशा फरकाने पराभव केला. परंतु कोरियाकडून भारताला १-४ अशी हार पत्करली.