भारतीय टेनिस संघटनेचा आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाला इशारा

नवी दिल्ली : दोन देशांमधील राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध इस्लामाबाद येथे होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ती त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी, असे पर्याय भारतीय टेनिस संघटनेने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाला दिले आहेत.

भारतीय टेनिस संघटनेने आधीपेक्षा आक्रमक पवित्रा घेत म्हटले आहे की, आशिया ओशियाना विभाग-१ची पाकिस्तानविरुद्धची लढत १४ आणि १५ सप्टेंबरला त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याची आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाला विनंती केली नाही, तर तसे ठणकावून सांगितले आहे.

सद्य:स्थितीआधारे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने निर्णय घ्यावा, अशी भारतीय टेनिस संघटनेने भूमिका घेतली आहे. सामना पुढे ढकलावा किंवा त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात यावा, हे दोन पर्याय उपलब्ध असल्याचे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे कार्यकारी संचालक जस्टिन अल्बर्ट यांनी म्हटले आहे. याआधीच्या ई-मेलमध्ये इस्लामाबादमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत अल्बर्ट यांनी समाधान प्रकट केले होते.

भारत-पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या संबंधांच्या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे संचालक मंडळ आणि डेव्हिस चषक समितीचे १०० टक्के समाधान न झाल्यास ही लढत पुढे ढकलली जाऊ शकते किंवा त्रयस्थ ठिकाणी खेळवली जाऊ शकते. २००१मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या ९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नॉर्थ कॅरोलिना येथील भारत-अमेरिका डेव्हिस लढत पुढे ढकलण्यात आली होती, असे भारतीय टेनिस संघटनेचे सरचिटणीस हिरोन्मय चॅटर्जी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या संचालक मंडळाकडे उपलब्ध पर्याय

१. डेव्हिस चषक लढत नोव्हेंबर/डिसेंबपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, तोवर वातावरणात सुधारणा होईल, अशी आशा आहे.

२.सुरक्षेसंदर्भातील खेळाडूंच्या चिंतेचे गांभीर्य बाळगत सध्याच्या स्थितीत इस्लामाबादला सामना खेळवणे योग्य न वाटल्यास महासंघ स्वखर्चाने त्रयस्थ ठिकाणी ही लढत आयोजित करू शकते.

भारतीय टेनिस संघटनेला व्हिसा निमंत्रण पत्र देऊनही त्यांनी अद्याप ही प्रक्रिया सुरू केलेली नाही, याबाबत मला आश्चर्य आणि चिंता वाटते आहे. ही प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी पाहुण्या संघाची असते.

-जस्टिन अल्बर्ट, आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे कार्यकारी संचालक

पाकिस्तान दौऱ्याची आम्ही कशी व्यवस्था करू, त्याची आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने चिंता करू नये. व्हिसासाठी अर्ज करण्याकरिता आमच्याकडे पुरेसा अवधी आहे. परंतु आतापर्यंत झालेल्या चर्चेशिवाय काही वेगळे सांगण्यासारखे तुमच्याकडे असेल, तर जरूर कळवावे.

-हिरोन्मय चॅटर्जी, भारतीय टेनिस संघटनेचे सरचिटणीस