भारतात सध्या सातत्याने एटीपी चॅलेंजर स्पर्धा आयोजित होत आहेत. देशातील अव्वल खेळाडूंनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. देशांतर्गत होणाऱ्या या स्पर्धामुळे जागतिक क्रमवारीत आगेकूच करण्यास मदत होते, अशा शब्दांत भारतीय खेळांडूनी या स्तुत्य उपक्रमाला दाद दिली आहे. अशा स्पर्धा सातत्याने आयोजित करायला हव्यात, अशा भावना या खेळाडूंनी व्यक्त केली. या स्पर्धापैकी सर्वात मोठी दिल्ली टेनिस स्पर्धा सोमवारपासून सुरू झाली आहे. याआधी चेन्नई आणि कोलकाता येथे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतात आयटीएफ फ्युचर्स दर्जाच्या स्पर्धा होतात, मात्र जागतिक क्रमवारीत अव्वल १५०मध्ये नसणाऱ्या खेळाडूंसाठी या स्पर्धेत सहभागी होणे कठीण होते. परंतु चॅलेंजर दर्जाच्या स्पर्धामुळे भारतीय खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी घरच्या मैदानांवरच मिळते आहे. दिल्ली येथे सुरू झालेल्या स्पर्धेत सोमदेव, युकी यांच्यासह सनम सिंग, साकेत मायनेनी, रामकुमार रामानाथन, करुणदय सिंग यांना खेळण्याची संधी ‘वाइल्ड कार्ड’द्वारे देण्यात आली आहे.
‘‘२००८ नंतर चॅलेंजर स्पर्धा भारतात सुरू झाल्या. प्रत्येक भारतीय टेनिसपटू या स्पर्धात खेळण्यासाठी उत्सुक आहे. यावर्षीच्या पहिल्या स्पर्धेतील मुख्य फेरीत आठ भारतीय खेळाडू होते. यापैकी चार खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. युकीने दुहेरी मुकुटावर नाव कोरले. गेल्याच आठवडय़ात साकेत-सनम जोडीने दुहेरीचे जेतेपद पटकावले. केवळ उपस्थितीपेक्षा भारतीय खेळाडू जेतेपदाची कमाई करत आहेत हे अतिशय समाधानाकारक आहे,’’ असे सोमदेव देववर्मनने सांगितले.