मुंबई : जगभरातील सर्वच क्रीडापटूंनी २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी कसून तयारी केली आहे; परंतु भारतीय टेनिसपटूंची या वर्षांतील कामगिरी पाहता ते पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच चमक दाखवतील, असा आशावाद भारताचा नामांकित टेनिसपटू लिएण्डर पेसने व्यक्त केला.

मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या २०२०च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अनावरण सोहळ्यासाठी ४६ वर्षीय पेस उपस्थित होता. या वेळी ऑस्ट्रेलियन स्पर्धेव्यतिरिक्त आगामी टोक्यो ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारतीय खेळाडूंच्या तयारीविषयी त्याने मत मांडले. ‘‘ऑस्ट्रेलियन स्पर्धा ही वर्षांतील पहिलीच ग्रँडस्लॅम स्पर्धा असल्याने यामध्ये अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळतात. विशेषत: महिलांमध्ये गेल्या काही वर्षांत तसेच चित्र पाहायला मिळाले आहे. ऑगस्टमधील अमेरिकन स्पर्धेनंतर बऱ्याच महिन्यांच्या विश्रांतीने ही मोठी स्पर्धा येत असल्याने खेळाडू काहीसे सुस्तावलेले असतात. त्यामुळेच आश्चर्यकारक विजयांची नोंद होते,’’ असे पेसने विश्लेषण केले.

‘‘भारतातील खेळाडूसुद्धा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थिरस्थावर झाले असून त्यांच्यात नक्कीच नामांकित खेळाडूंना पराभूत करण्याची क्षमता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन स्पर्धेतही आपले खेळाडू नक्कीच चमकदार कामगिरी करतील,’’ असे १८ ग्रँडस्लॅम विजेत्या पेसने सांगितले. २० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान ऑस्ट्रेलियन स्पर्धा रंगणार आहे.

‘‘मात्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा हेच तूर्तास सर्व क्रीडापटूंच्या केंद्रस्थानी असल्याने त्यासाठी भारतीय टेनिसपटूही तयारीला लागले आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय खेळाडूंचा तंदुरुस्तीचा दर्जा उंचावला असून त्यांच्याकडून सर्वानाच ऑलिम्पिकमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ऑलिम्पिकमध्ये यश मिळवण्यासाठी खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक बाबींवर फार लक्ष द्यावे लागते, हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. भारताकडे गुणी टेनिसपटूंची फौज असून निश्चितच ते उत्तम खेळ करतील,’’ असे पेसने सांगितले.

ऑलिम्पिकची उत्सुकता, परंतु ऑस्ट्रेलियन स्पर्धेविषयी साशंकता!

२०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्वत:ही सहभागी होणार आहे; परंतु ऑस्ट्रेलियन स्पर्धेविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे पेसने सांगितले. ‘‘पुढील वर्षी रंगणारे टोक्यो ऑलिम्पिक हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे असून मी निश्चितच मिश्र दुहेरी गटात खेळणार आहे; परंतु त्यासाठी तंदुरुस्ती राखणेही आवश्यक असल्याने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही; परंतु लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेईन,’’ असे पेस म्हणाला.