मीराबाई चानूकडून भारताला पदकाची अपेक्षा

निंगबो (चीन) : भारताची माजी जगज्जेती मीराबाई चानू हिच्यासह अन्य वेटलिफ्टर्सना टोक्यो २०२० ऑलिम्पिक पात्रता गाठण्याची संधी मिळणार आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचे ध्येय भारतीय वेटलिफ्टर्सनी बाळगले आहे.

पाठीच्या दुखण्यामुळे तब्बल ९ महिने खेळापासून दूर राहावे लागलेल्या चानूने दमदार पुनर्रागमन करत ऑलिम्पिकसाठीच्या दावेदारीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले होते.

फेब्रुवारीत थायलंडमध्ये झालेल्या ईजीएटी चषक स्पर्धेत चानूने स्नॅच प्रकारात ८२ तर क्लिन अ‍ॅण्ड जर्क प्रकारात ११० किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र ऑलिम्पिक पात्रता गाठायची असल्यास चानूला आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

आंतररराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या नूतन नियमावलीनुसार चानूला ४८ किलो वजनी श्रेणीतून ४९ किलो गटात जावे लागले आहे.

पुरुषांमध्ये भारताच्या सतीश शिवलिंगम याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यामुळे सर्व आशा युवा ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता जेरेमी लालरिनुंगा याच्यावर आहेत. जेरेमीने नव्या नियमांनुसार ६२ किलो गटातून ६७ किलो गटात प्रवेश केला आहे. विकास ठाकूर ९६ किलो वजनी गटातून तर अजय सिंग ८१ किलो वजनी गटातून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.