भारताचे दोन वेटलिफ्टिंगपटू उत्तेजक सेवनाबाबत दोषी आढळल्यामुळे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने उत्तेजक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्य समिती नेमली आहे. ३ डिसेंबरपासून या समितीकडून दोन्ही खेळाडूंची चौकशी केली जाणार आहे.
प्रमिला कृष्णन व मिनाती सेठी या दोन्ही खेळाडू पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या वेळी उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्या. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना जागतिक वेटलिफ्टिंग महासंघाच्या मान्यतेने आयोजित केल्या जाणाऱ्या कोणत्याही स्पर्धामध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून या दोन्ही खेळाडूंना वगळण्यात आले आहे.
‘‘प्रथमदर्शनी मला या दोन्ही खेळाडूंनी उत्तेजक घेतले नसल्याचे व या दोन्ही खेळाडू निदरेष असल्याचे आमचे मत आहे. मात्र त्याची खातरजमा करण्यासाठी आम्ही पाच सदस्यांमार्फत या दोन्ही खेळाडूंची चौकशी करणार आहोत. जर तीन वेळा या खेळाडू दोषी आढळल्या तर त्यांच्यावर एक वर्षांकरिता बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तसेच जर आणखी एक खेळाडू दोषी आढळला तर रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेस भारतीय खेळाडूंना मुकावे लागण्याची शक्यता आहे. आम्ही या दोन्ही खेळाडूंच्या दुसऱ्या चाचणीच्या अहवालाची वाट पाहत आहोत,’’ असे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी सांगितले.
प्रमिलाने राष्ट्रकुल स्पर्धेतील ५३ किलो गटात रौप्यपदक मिळवले होते तर सेठी हिने ५८ किलो गटांत कांस्यपदकाची कमाई केली होती.
‘‘भारतीय खेळाडूंना व संघटकांना बदनाम करण्यासाठी हे उत्तेजकाचे कुंभाड रचण्यात आले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा ११ ऑक्टोबर रोजी सुरू झाली व त्याआधी ९ ऑक्टोबर रोजी दोन्ही खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. त्या वेळी या दोन्ही खेळाडू निदरेष आढळल्या होत्या. स्पर्धेच्या वेळी उत्तेजक चाचणी घेतली जाणार हे माहीत असताना या दोन्ही खेळाडू हेतूपूर्वक आपल्या पायावर उत्तेजकाचा धोंडा कशाला पाडून घेतील. यापूर्वीही या खेळाडू कधीही दोषी आढळलेल्या नाहीत,’’ असे यादव यांनी सांगितले.
जमीर हुसेन व अपूर्वा छेत्री हे दोन्ही खेळाडू राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने घेतलेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळले होते. उत्तेजक प्रकरणांमुळे यापूर्वी चार वेळा भारतीय वेटलिफ्टिंग महासंघावर बंदीची कारवाई करण्यात आली होती.