जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावरील लुकासवर मात

भारताचा डेव्हिसपटू युकी भांब्रीने जागतिक टेनिस क्रमवारीत १२व्या स्थानावरील खेळाडू लुकास पॉलीवर मात केली आणि इंडियन वेल्स चषक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. त्याने हा सामना ६-४, ६-४ असा जिंकला.

युकीने एक तास आणि १९ मिनिटांमध्ये ही लढत जिंकून कारकीर्दीतील सनसनाटी विजय नोंदवला. यापूर्वी त्याने ऑगस्ट २०१७मध्ये सिटी खुल्या स्पर्धेत २२व्या क्रमांकावरील गेल मोंफिल्सला पराभवाचा धक्का दिला होता.

युकीने येथील दुसऱ्या फेरीतील विजयासह ४५ मानांकन गुण व ४७,१७० डॉलर्सची कमाई निश्चित केली आहे. त्याला पुढच्या फेरीत अमेरिकन खेळाडू सॅम क्युएरीशी खेळावे लागणार आहे. क्युएरीने जर्मनीच्या मिशा जेव्हेरेव्हवर ६-४, ७-५ असा संघर्षपूर्ण विजय नोंदवला.

भारताच्या रोहन बोपण्णा व त्याचा दुहेरीतील सहकारी एडवर्ड रॉजर व्हॅसेलीन यांना दुहेरीतील पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले.

जोकोविचचे आव्हान संपुष्टात

इंडियन वेल्स : जपानच्या टॅरो डॅनियलने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पध्रेत पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात आणले. टॅरोने ७-६ (७/३), ४-६, ६-१ अशा फरकाने हा सामना जिंकला आणि तिसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत १०९व्या स्थानावर असलेल्या टॅरोचा फ्रान्सच्या गाईल मॉनफिल्सशी सामना होणार आहे.