टेनिसचा बादशहा रॉजर फेडररने स्टान वॉवरिन्कावर मात करून एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद जिंकले. या स्पर्धेचे हे फेडररचे पाचवे जेतेपद ठरले. फेडररने अंतिम फेरीत वॉवरिन्कावर ६-४, ७-५ अशी मात करून जेतेपदावर कब्जा केला.
मागील वर्षी गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे फेडररला टेनिसपासून काही काळ दूर रहावे लागले होते. यातून सावरून फेडररने जानेवारी महिन्यात दमदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावून १८ वे ग्रॅंडस्लॅम जिंकले होते.
इंडियन वेल्सचे जेतेपद पटकावून फेडररने आता नोव्हाक जोकोव्हीच याच्या पाच वेळा स्पर्धेचे जेतेपद जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. याआधी फेडररने २००४, २००५, २००६ आणि २००६ साली ही स्पर्धा जिंकली होती.

 

ऑस्ट्रेलियन ओपन किंवा इंडियन वेल्स जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर नव्हतेच. फक्त क्रमवारीत पहिल्या आठ खेळाडूंच्या आत स्थान मिळवण्याचे उद्दीष्ट होते आणि त्याच प्रयत्नात प्रत्येक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा मानस ठेवला, असे फेडरर म्हणाला. इंडियन वेल्सचे जेतेपद हे माझ्यासाठी यंदाच्या वर्षाची चांगली सुरूवात आहे, असेही तो पुढे म्हणाला.

स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या वॉवरिन्काने फेडररच्या खेळाचे कौतुक केले. फेडरर जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे आणि त्याच्या विरुद्ध पराभवाला सामोरे जाण्याची आम्हाला सवयच आहे, असे वॉवरिन्का म्हणाला. फेडरर सध्या अप्रतिम खेळ दाखवत आहे. टेनिस कोर्टवर एका हरहुन्नरी टेनिसपटूने ज्यापद्धतीने खेळायला हवे, तसे तो सर्व बाज वापरून खेळतो आहे. त्याचा टायमिंग अप्रतिम आहे, असे वॉवरिन्का म्हणाला.